सांगली: खंडोबाचीवाडी येथे भरधाव कार रसवंती गृहात घुसली; मुलगा ठार | पुढारी

सांगली: खंडोबाचीवाडी येथे भरधाव कार रसवंती गृहात घुसली; मुलगा ठार

पलूस, पुढारी वृत्तसेवा : खंडोबाचीवाडी (ता.पलूस) येथील पेट्रोल पंपाजवळ भरधाव जाणारी कार शेडमध्ये घुसली. या अपघातात समर्थ संतोष शिंदे (वय ११) या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. समर्थ खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होता. ही घटना आज (दि.२६) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चालक फरार झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तासगाव- भिलवडी रोडवर खंडोबाचीवाडी येथे नायरा पेट्रोल पंपाजवळ संतोष गोपाळ शिंदे (रा. खंडोबाचीवाडी) यांचे रसवंती गृह आहे. या रसवंती गृहात चालक शिंदे यांचा मुलगा समर्थ संतोष शिंदे (वय ११ ) बसला होता. यावेळी अचानक भिलवडी स्टेशनकडून भरधाव जाणारी कार (एमएच-१० सी. एक्स.४०८१) रसवंती गृहाच्या शेडमध्ये घुसली. त्यानंतर कार रसवंती गृहाचा पत्रा उचकटून शेतात कोसळली. यात समर्थ कारच्या पुढील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी खंडोबाचीवाडी, भिलवडी येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली. चालक वाहन सोडून पसार झाला आहे. ही घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी चालकाचा शोध सुरु केला आहे. समर्थच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

हेही वाचा 

Back to top button