इस्लामपुरात थकीत करदात्यांची नावे झळकली चौकात | पुढारी

इस्लामपुरात थकीत करदात्यांची नावे झळकली चौकात

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  वारंवार आवाहन करूनही थकीत कर न भरलेल्या इस्लामपूर शहरातील टॉप टेन थकीत मालमत्ता धारकांची नावे डिजिटल पोस्टर्सवर झळकली आहेत. नगरपालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात असे पोस्टर्स लावले आहेत.

मार्च महिना असल्यामुळे पालिकेची वसुली सुरू आहे. ही वसुली केवळ 55 टक्केच आहे. त्यामुळे शासन स्तरावर याबाबत नाराजी आहे. याचा 15 व्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार विकास निधीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थकीत कर भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने अनेकवेळा नागरिकांना केले होते. जे थकबाकीदार वेळेत कर भरणार नाहीत, त्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला होता. तरीही थकबाकी न भरल्याने पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागातील थकबाकीदारांची नळ कनेक्शन बंद करून त्यांची नावे त्या त्या प्रभागात डिजिटल पोस्टर्सवर लावली आहेत.

मालमत्ता जप्त करून लिलाव काढणार

थकबाकीदारांनी कर भरला नाही तर अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव काढण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी दिला आहे. आता ही मात्राही थकबाकीदारांना कितपत लागू पडते ते पहावे लागेल.

Back to top button