अभयारण्याला कुंपण घालण्याबाबत शासन उदासीन | पुढारी

अभयारण्याला कुंपण घालण्याबाबत शासन उदासीन

चरण; पुढारी वृत्तसेवा :  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांपासून पाळीव जनावरे आणि शेतीचे मोठे नुकसान होत असून या जंगलासाठी कायमस्वरूपी कुंपण घालण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरीवर्गातून होत आहे. मात्र, याबाबत शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळत आहे.

चांदोली अभयारण्याचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाला आहे. या जंगलातील गवे, डुकरे, बिबटे, वानरे आदी प्राणी या जंगलात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील गुडे, मानेवाडी, पाचगणी, बाबरवाडी, ढाणकेवाडी, किनरेवाडी, काळमवाडी, चिंचेवाडी, चरण, खोतवाडी, येसलेवाडी, भाडुगळेवाडी, भास्तेवस्ती, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मणदूर-धनगरवाडा, सिद्धेश्वरवाडी, मिरुखेवाडी ही गावे आणि वाडी-वस्त्या जंगलाला लागून असल्याने जंगलातील रान गवे, डुकरे, बिबटे, वानरे आदी प्राणी येथील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान करत असतात.

डोंगरात वसलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात येणारे थोडेफार पीक आणि रब्बीतील ज्वारी पीक अत्यल्प प्रमाणात असते. या गावातील मोठ्या प्रमाणात लोक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई येथे आहेत. येथील शेतकरी तुटपुंज्या जमिनीत एखादे पीक घेत असतो. त्याही पिकांचे नुकसान जंगली प्राण्यांकडून होत असते. यासाठी वन्यजीव आणि वनविभाग यांच्याकडे झालेल्या पिकांच्या नुकसानी आणि पाळीव जनावरांचे हल्ले यांचे पंचनामे करून नाममात्र भरपाईसाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. तरीही वेळेत योग्य मोबदला मिळत नाही. गेल्या आठ दिवसांपूर्वी चरण येथील एका पाझर तलावात सहा गव्यांचा कळप शेतकर्‍यांना निदर्शनास आला होता. पाझर तलावाजवळील ऊस, शाळू व आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून किनरेवाडी व चिंचेवाडी परिसरात 20 ते 25 रानटी डुक्करांनी धुमाकुळ घातला आहे. नदीकाठच्या शेतातून वानरांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. एकूणच शिराळा पश्चिम भागातील लोकांना शेती टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चांदोली अभयारण्य प्राण्यांना पुरेसे पाणी व अन्न मिळत नसल्याने गवे, बिबट्या, रानटी डुक्करे व वानरे लोक वस्तीमधून वावर वाढला आहे. एकूणच अभयारण्यातील अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून येत आहे.

राजकीय नेतेमंडळींकडून आवाज का उठवला जात नाही…

जंगलातील रान गवे, डुकरे, बिबटे, वानरे यांचे कळप बाहेर येऊन पिकांचे नुकसान करत आहेत. तसेच बिबट्याकडून शेळी, रेडके, गायी, म्हैशी, पाळीव कुत्री यांना ठार मारत असल्याने जंगलाला कुंपण घालावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची आहे. याबाबत राजकीय नेतेमंडळींकडून आवाज का उठवला जात नाही, असे बोलले जात आहे.

Back to top button