ढवळीत भोंगा वाजतो अन् मोबाईल, टीव्ही बंद होतो...

मिरज; जालिंदर हुलवान : ढवळी (ता. मिरज) या गावामध्ये दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी 13 मार्चपासून सुरू आहे. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती व चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
गावची सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. ढवळी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सरपंच व सदस्य यांनी एकत्र येऊन एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तसा ठराव यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. सरपंच आकाश गौराजे, उपसरपंच स्वप्निल बनसोडे, सदस्य जायदा मुलानी, सरिता मगदूम, सुजाता अकिवाटे, वृषभनाथ अथने, बाळासाहेब चिपरे, स्मिता लंगोटे, सुषमा अकिवाटे, ग्रामसेवक तनवी सावंत, रोजगार सेवक संतोष गौराजे, कर्मचारी संजय मगदूम, गणपती कोळी, सुभाष लोखंडे दिलीप आळते, आनंदा अकिवाटे यांनी याबाबत पुढाकार घेतला.
याबाबत सरपंच आकाश गौरजे म्हणाले, कौटुंबिक नात्यातील हरवलेला संवाद पुन्हा मिळावा, लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा यावी, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व शैक्षणिक दर्जा उत्तम घडावा, यासाठी हा निर्णय घेतला. येथील संजीव मगदूम हा ग्रामपंचायत कर्मचारी रोज सायंकाळी सात वाजता भोंगा वाजवतो. त्यानंतर मोबाईल व टीव्ही बंद करण्यात येतो. तोच कर्मचारी नऊ वाजता भोंगा वाजवतो. त्यानंतर गरज असल्यास मोबाईल, टीव्ही सुरू केले जातात. सात ते नऊ या वेळेत जर कोणी टीव्ही किंवा मोबाईल सुरू केला तर त्याला दंडही करण्यात येणार आहे.