होमलोनसाठी दिले पॅनकार्ड; ठगाने केला घोटाळा ! | पुढारी

होमलोनसाठी दिले पॅनकार्ड; ठगाने केला घोटाळा !

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  होमलोन देण्याच्या बहाण्याने घेतलेल्या पॅनकार्ड व अन्य कागदपत्रांचा वापर जीएसटी नोंदणी व जीएसटी चुकवेगिरीसाठी केला असावा, अशी शक्यता समोर येत आहे. त्याअनुषंगाने दिल्ली स्टेट जीएसटी बरोबरच सायबर क्राईमकडेही तक्रार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सांगलीतील एका व्यक्तीच्या पॅन नंबरचा वापर करून दिल्लीत 18 कोटी रुपयांचा व्यवहार दाखवत 3.50 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. घोटाळबाजाने सांगलीतील ज्या व्यक्तीचा पॅन नंबर वापरला आहे, ती व्यक्ती केंद्र शासनाच्या एका उपक्रमात अधिकारी पदावर आहे. फसवणूक झाल्याचे कळताच सांगलीतील या व्यक्तीने जीएसटी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे.

सांगलीतील व्यक्तीचा पॅननंबर दिल्लीत घोटाळा करण्यासाठी कसा वापरला, असा प्रश्न उपस्थित होतो. घोटाळबाजाने सांगलीतील या व्यक्तीचा पॅन नंबर कोठून मिळवला, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याबाबत माहिती घेतली असता सायबर क्राईमचाही प्रकार समोर येत आहे. सांगलीतील या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी होमलोनसाठी मोबाईलवर फोन आला होता. होमलोन देण्याच्या बहाण्याने संंबंधित व्यक्तीकडून पॅन कार्ड व अन्य कागदपत्रे पाठविण्यास सांगितले होते. ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनसोबत पॅनकार्डसह अन्य काही कागदपत्रे सादर करण्यात आली होती. मात्र नंतर होमलोन देण्यासाठी टाळाटाळ केली जाऊ लागली. पैसे भरण्यास सांगितले जाऊ लागले. त्यामुळे सांगलीतील व्यक्तीने होमलोन मिळवण्याचे प्रयत्न सोडून दिले. मात्र ऑनलाईन सादर केलेल्या पॅनकार्डचा वापर करून घोटाळबाजांनी दिल्लीत जीएसटी नोंदणी करणे, त्याद्वारे कोट्यवधींचा व्यवहार दाखवणे व जीएसटी चुकवणे आदी प्रकार घडला असावा, अशी शक्यता दुणावली आहे. त्यादृष्टीनेही चौकशी होणे गरजेचे आहे.

बहाणे अनेक; सतर्कता गरजेची

होमलोन देणे, लॉटरी लागणे, बक्षीस या बहाण्याने मोबाईलवरून कॉल येण्याचे प्रकार अनेकांना अनुभवयास मिळाले आहेत. अशावेळी पाठवलेल्या कागदपत्रांचा गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असते. तसा प्रकार जीएसटी घोटाळ्याच्या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे फसवणूक होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.

Back to top button