सांगली जिल्ह्यात कृषी विद्यापीठ गरजेचे! | पुढारी

सांगली जिल्ह्यात कृषी विद्यापीठ गरजेचे!

सांगली; विवेक दाभोळे :  अवघ्या राज्यभरात सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच सोलापूर हा सारा टापू कृषीप्रधान आहे. या भागाने कृषी औद्योगिक क्रांतीतून ग्रामीण अर्थकारणाला गती दिली आहे. मात्र या भागातील शेतकर्‍यांना, पशुपालकांना नवनवीन संशोधन उपलब्ध व्हावे, यातून अधिकाधिक उत्पन्न मिळावे तसेच या सार्‍याच भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना शेतीमधील दर्जेदार उच्च ज्ञान भागातच उपलब्ध व्हावे यासाठी आता राज्य शासनाने तातडीने सांगली जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची निर्मिती करण्याची गरज आहे. तशी या क्षेत्रातून जाणकारांतून मागणी देखील होत आहे. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील शासनाच्या साडेचारशे एकर जागेतून यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते.

पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच सोलापूर हे चार जिल्हे शेती, शेतीसंबंधित विविध उद्योग यात राज्यात आघाडीवर आहेत. या चार जिल्ह्यांचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणून सांगली जिल्ह्यात हे कृषी विद्यापीठ अधिक ताकदीने उभे राहू शकते.
या चारही जिल्ह्यातील शेतीत विलक्षण वैविध्य राहिले आहे. एकीकडे अतिपाण्याची उपलब्धता तर दुसरीकडे काहीसा अवर्षण प्रवण टापू असे या भागाचे वैशिष्ट्य राहिले आहे. या दोन्ही भागातील शेतकर्‍यांना आता शासनाने नवीन, व्यापक, मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यातून या भागात निश्चितपणे व्यापक आयाम मिळू शकतो.

विशेष म्हणजे हे चारही जिल्हे राजकीय आघाडीवर दिग्गज नेत्यांच्या मांदियाळीने सजले आहेत. या सर्वच पक्षातील ताकदवान नेत्यांनी ताकदीने पाठपुरावा केला तर जिल्ह्यात कृषी विद्यापीठ साकारणे मुळीच अवघड होणार नाही. राज्यात सध्या चार कृषी विद्यापीठे आहेत. कोकणासाठी दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पश्चिम महाराष्ट्रासाठी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तर विदर्भासाठी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे.

अर्थात पश्चिम महाराष्ट्रासाठी राहुरी येथे कृषी विद्यापीठ असले तरी त्या ठिकाणी जाणे हे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी, शेतीविषयक अभ्यासकांना फारच वेळखाऊ ठरते. अगदी लांब पडते म्हणून या भागातील अनेक विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणाचा विचार बदलला आहे. यातून या सार्‍याच भागाचे मोठेच नुकसान झाले आहे आणि याबाबत काही निर्णय झालाच नाही तर नुकसानीची परंपरा कायमच राहणार आहे.

रांजणी येथील जागेचा होईल उपयोग

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आता मोठ्या सिंचन योजनांचे पाणी फिरू लागले आहे. शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध झाल्याने या सार्‍याच भागात हरितक्रांतीचीच जणू सुरूवात झाली आहे. नजीकच्या काळात या भागातील शेती द्राक्षे, डाळिंबे, आले, हळद, ऊस आणि विविध भाजीपाल्याची पिके याने समृध्द होणार, हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज उरलेली नाही. याच भाागत रांजणी येथे शेळी- मेंढी पालन विकास मंडळाच्या अखत्यारित जवळपास चारशे- साडे चारशे एकर जागा आहे. या जागेत हे नवीन कृषी विद्यापीठ होणे सहज शक्य आहे. जागा, मुबलक पाणी याची उपलब्धता असल्यामुळे हीच जागा कृषी विद्यापीठासाठी योग्य ठरू शकते.
कोल्हापूर जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था तर तोडीस तोड राहिली आहे. पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कडवी आदी नद्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा हा बागायती झाला आहे. या जिल्ह्यात उच्चांकी असे उसाचे पीक निघत आहे. तर याचवेळी चंदगड, आजरा भागातील शेतकरी काजू लागवडीत विविध प्रयोग करत आहे.

कोल्हापुरी गुळाची खुमारी तर लय भारी अशीच स्थिती आहे. या गूळ उत्पादकांसाठी आता कोल्हापूर येथे गूळ संशोधन केंद्र आहे. मात्र स्वतंत्र कृषी विद्यापीठामुळे या गूळ उत्पादकांना स्थानिक पातळीवर उच्चस्तरीय मार्गदर्शन मिळू शकते.

विद्यार्थ्यांसाठी ठरतेय गरजेचे

सांगली जिल्हा हा शेतीक्षेत्रात राज्यात आघाडीवर आहे. या जिल्ह्यातच केवळ उसाखालील क्षेत्र सरासरी सव्वा लाख हेक्टरच्या घरात राहिले आहे. जिल्हा प्रतिदिन दुग्धोत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याचा हळदीसाठी आशिया खंडात लौकिक आहे. जत तालुक्यातील माडग्याळ येथील माडग्याळी मेंढीचा तर खास जी. आय. मानांकन मिळण्यासारखा दर्जा राहिला आहे. जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास या सार्‍याच बाबींसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहेच. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच हक्काची उच्च कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सांगली जिल्ह्यातच कृषी विद्यापीठाची गरज यासाठी…

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक आघाडीवर कमालीचा विकसित आहे. या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. सातारा जिल्ह्यात तर सातारा येथे रयत शिक्षण संस्था हे आशिया खंडातील नामांकित, दर्जेदार शैक्षणिक संकुल आहे. सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे. केवळ सांगली जिल्ह्यातच असे एखादे मोठे शैक्षणिक संकुल अथवा शासकीय संस्था नाही. याचा विचार करता सांगली जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे काळाची गरज आहे. अवघ्या देशात सांगली जिल्ह्याचा द्राक्ष, हळदीच्या उत्पादनासाठी लौकिक राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील शेतकर्‍यांनी आपले शेतीतील पारंपरिक ज्ञान वापरून द्राक्षाच्या नवनवीन जातींची निर्मिती केली आहे. या सर्वच प्रयोगशील शेतकर्‍यांच्या सृजनशीलतेला अधिक वाव हा केवळ स्वतंत्र कृषी विद्यापाठीतूनच मिळू शकतो. यातून भागाच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळू शकते.

शासनाला निर्णय घ्यावाच लागेल..!

सांगली जिल्हा जरी राजकीय आघाडीवर मोठा ताकदवान मानला जात असला तरी जिल्ह्यात शासनाची एखादी नाव घेण्यासारखी मोठी संस्था नाही. अगदीच पाहिले तर तुरची फाटा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच कुंडल येथे वनविभागाची प्रशिक्षण अकॅडमी आहे. मात्र या दोन्ही संस्थांशी अर्थाअर्थी तसा सामान्यांचा, शेतकर्‍यांचा काहीच संपर्क येत नाही. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवीन आयाम देण्यासाठी, शेतीक्षेत्रासाठी गती देण्यासाठी जिल्ह्यात आता स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे काळाची गरज आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांत अनेक ताकदवान नेते आहेत. या सर्वच नेत्यांनी पक्षभेद, श्रेयवाद बाजूला ठेवून एकत्रितरीत्या कृषी विद्यापीठासाठी ताकद लावली तर शासनाला असा निर्णय घ्यावाच लागेल.

दिग्गज नेत्यांची जिल्ह्यास परंपरा… पण नाही एकही मोठा शासकीय उद्योग, संस्था

सांगली जिल्ह्यास अनेक बड्या, दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा आहे. जिल्ह्याचे सुपुत्र वसंतरावदादा पाटील यांनी तब्बल चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात दादांची भूमिका अत्यंत ताकदवान ठरत होती. नंतरच्या काळात ज्येष्ठ नेते स्व. डॉ. पतंगराव कदम, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना देखील राज्याच्या सत्तेत मोठे स्थान होते. याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत पाटील यांचेही राज्याच्या राजकारणात आघाडीचे स्थान राहिले आहे. मात्र दुर्दैवाने आजअखेर जिल्ह्यात एखादा नाव घेण्यासारखा मोठा प्रकल्प, संस्था उभी राहू शकलेली नाही. किमान आता तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपले राजकारण हे राजकारणापुरते मर्यादित ठेवून जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे, अशीच जिल्ह्यातील सामान्यजनांची, शेतकर्‍यांची आणि जाणकारांची अपेक्षा आहे.

Back to top button