सावधान…एच 3 एन 2 आजाराची साथ शक्य | पुढारी

सावधान...एच 3 एन 2 आजाराची साथ शक्य

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात ‘एच 3 एन 2’ सदृश्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने गावोगावी रुग्ण संख्या शेकड्यांनी वाढत आहे. कोरोनासारखीच लक्षणे असल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. कितीही उपचार केले तरी संसर्ग दहा ते 15 दिवस राहत असल्याने रुग्ण हैराण झाले आहेत. बहुतांश ठिकाणी दवाखाने हाऊसफुल्ल असल्याचे दिसत आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे. तसेच प्रतिजैविक औषधांच्या अतिवापराने शरीर इतर आजारांना लगेच बळी पडत आहे. यामुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. न्युमोनिया, धाप, लंग्ज फायब्रोसिस, रक्ताची गुठळी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वातावरणात सतत बदल होत आहे. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन व सायंकाळी पुन्हा गारवा निर्माण होत आहे. मागील आठवड्यापासून वातावरण काहीसे ढगाळ बनले आहे. यामुळे इन्फ्लूएंझासदृश एच 3 एन 2 या विषाणूचे संक्रमण वाढत आहे. ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी व सर्दी ही लक्षणे दिसत आहेत. प्रामुख्याने खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. स्वर यंत्राला इजा होऊन आवाजही बसत असल्याच्या अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. कितीही उपचार केले तरी हा आजार दहा ते पंधरा दिवस बरा होत नाही.

दोन ते तीन वेळा इंजेक्शन, डॉक्टरांजवळील तसेच मेडिकलमधील औषधांचे डोस, खोकल्यासाठी चार-पाच औषधांच्या बाटल्या घेतल्यानंतरच आजार बरा होत असल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे गावोगावी दवाखाने हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे. कोरोनासारखीच या आजाराची लक्षणे असल्याची लोकांत चर्चा सुरू आहे.

मिरज सिव्हिलमध्ये स्वतंत्र कक्ष

एच 3 एन 2 हा नवा व्हायरस आला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी व या व्हायरसची लागण झालेल्यांवर उपचार करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मिरज सिव्हिलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी दिली.

मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. कोरोनाच्या कालावधीपासून या रुग्णालयाकडे शासनाने अधिक लक्ष दिले आहे. शेकडो कोरोना रुग्णांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात दिलासा मिळाला होता. शासकीय रुग्णालय हे केवळ कोरोना रुग्णांसाठी उपचार करणारे हॉस्पिटल बनवण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून एच थ्री एन टू ह्या व्हायरसची चर्चा सुरू आहे. या व्हायरसमुळे जनतेला त्रास होऊ नये व व्हायरसची लागण झाल्यास त्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत यासाठी शासकीय रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मिरजेतील शासकीय रुग्णालयात असा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या शासकीय रुग्णालयात या नव्या व्हायरसशी लढण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये एमआरआय ही मशीन खूप जुनी झाली आहे. ही मशीन बदलून नव्याने घेणे गरजेचे होते. या मशीनसाठी सुमारे 17 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीतून लवकरच या रुग्णालयास अत्याधुनिक असे एमआरआय मशीन उपलब्ध होईल. त्याचा गरजू रुग्णांना लाभ होणार आहे.

नर्सिंग कॉलेजसाठी शासनाकडे प्रस्ताव

या रुग्णालयात स्वतंत्र नर्सिंग कॉलेज बनवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या नर्सिंग कॉलेजसाठी शंभर जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवाय येथे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनामार्फत उभारावे असाही प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पालकमंत्री याबाबत पाठपुरावा करीत आहेत. नर्सिंग कॉलेज आणि सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल झाल्यास त्याचा फायदा या भागातील गरजूंना होणार आहे.

जिल्ह्यात सध्या ताप, सर्दी, खोकला, थकवा, उलटी, घशात दुखणे, डायरिया अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही लक्षणे साधारणपणे आठवडाभर दिसून येतात. खोकणे अथवा शिंकणे यामुळे संसर्ग अधिक पसरू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून व औषधे घ्यावी. मास्क, सॅनिटायझरच्या वापराबरोबर सोशल डिटन्स पाळणे गरजेचे आहे. यात्रा, मिरवणूक, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
– डॉ. संजय साळुंखे जिल्हा शल्य चिकित्सक

Back to top button