सांगली : महापालिका बजावणार दत्त इंडियाला नोटीस | पुढारी

सांगली : महापालिका बजावणार दत्त इंडियाला नोटीस

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  साखर कारखान्याच्या मळीचे सांडपाणी शेरीनाल्यात मिसळत असल्याने दत्त इंडियाला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातून देण्यात आली. दरम्यान, शेरीनाल्याची धुळगाव योजना दोन दिवसांत कार्यान्वित होईल. त्यामुळे शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळणे बंद होईल, असेही सांगण्यात आले.

नदी प्रदूषणामुळे मासे मृत झाल्यामुळे नोटिसांचा सिलसिला सुरू झाला आहे. शेरीनाल्याचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. नदीचे प्रदूषण होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला नोटीस बजावली होती. महापालिकेने उपाययोजनांसंदर्भात हालचाली गतिमान केल्या आहेत. शेरीनाल्याची धूळगाव पाणी योजना दोन दिवसांत कार्यान्वित केली जाणार आहे. तीनशे अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळणार नाही. हे पाणी उपसा करून कवलापूर येथील प्रक्रिया केंद्रावर व तेथून धूळगाव परिसरातील शेतीला दिले जाणार आहे. शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 85 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रस्ताव शासनाला सादर करून पाठपुरावा केला जाणार आहे.

Back to top button