सांगली : शहरासह जिल्ह्यात सप्तरंगांची बरसात | पुढारी

सांगली : शहरासह जिल्ह्यात सप्तरंगांची बरसात

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शहरासह जिल्ह्यात अलोट उत्साहात रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमी साजरी झाली. दोन वर्षांत प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणामुळे चौकाचौकात डॉल्बीच्या तालावर भिजून चिंब झालेली अवघी तरुणाई थिरकली. रविवारी सकाळपासूनच बालगोपालांच्या उत्साहाला उधाण आले होते. नैसर्गिक रंग आणि जोडीला पाण्याचा मुक्त वापरामुळे सर्वत्र सप्तरंगांच्या बरसातीचा माहोल होता. रंगाचा उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्याने तरुणाईबरोबरच महिलांनी, युवतींनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला.

उन्हाचा तडाखा वाढल्याने गारव्यासाठी अनेक ठिकाणी विविध मंडळांच्या वतीने शॉवर उभारण्यात आले होते. या ठिकाणी संगीताच्या तालावर तरुणाईने चांगलाच ठेका धरला होता. दरम्यान, रंगांची उधळण करत सुसाट वेगाने जाणार्‍या हुल्लडबाजांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र काही नशेखोरांनी रस्त्यावरच अड्डा मांडल्याचे दिसून आले. दुपारनंतर नदीकाठी आणि धरणावरदेखील रंग खेळण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Back to top button