येत्या दोन वर्षात खानापूर मतदार संघ राज्यात अग्रेसर : आमदार बाबर यांना विश्वास | पुढारी

येत्या दोन वर्षात खानापूर मतदार संघ राज्यात अग्रेसर : आमदार बाबर यांना विश्वास

विटा, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पात खानापूर मतदार संघाला भरघोस निधी मिळाला आहे. येत्या दोन वर्षात खानापूर मतदार संघ राज्यात अग्रेसर असेल, असा विश्वास शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शनिवार-रविवार सुट्टीचे दिवस असल्याने आमदार बाबर विटा (जि. सांगली) येथे परतले आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पातून आपल्या मतदारसंघाला काय मिळाले? याची उत्सुकता लोकांना असते.

रस्त्यांसाठी ८२ कोटी ८५ लाख रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३६ कोटी ५८ लाख रुपये मिळणार आहेत. यातून अत्यंत उपेक्षित आणि दुर्गम भागातील गावे आपण रस्ते कामासाठी धरले आहेत. आटपाडी ग्रामपंचायत खालील शेडगेवाडी ते बनपूरी,भूड- जाधववाडी – खानापूर, जाधववाडी-बलवडी, देवकरमळा-भेंडवडे, बनपूरी-शेडगेवाडी अशा काही रस्त्यांचा समावेश आहे.

१६३ किलोमीटरचे रस्ते हायब्रीड अॅन्युईटीतून होणार

महाबळेश्वर-विटा रस्त्याच्या धर्तीवर तालुक्यातील काही रस्ते हायब्रीड अॅन्युईटीच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्ते चांगल्या दर्जाचे होतील आणि त्यांची देखभाल दुरुस्ती संबंधीत ठेकेदारावर असणार आहे. यात तालुक्यातील खानापर–पेड-विसापूर, खरसुंडी- बलवडी –पारे- आळते- चिखल गोठण-पलूस आणि विटा-पारे – हातनूर-बस्तव डे या चार रस्त्यांचा समावेश आहे. एकूण १६३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी २ कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

वीज उपलब्धतेसाठी सौरऊर्जा

आपल्या भागात पाणी आले तरी वीजेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी महावितरणने योजना आणली आहे. त्यामध्ये गायरान जमिनी अथवा शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी भाड्याने घेऊन त्यावर सौर उर्जा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.

टेंभूच्या ६ व्या टप्प्याची सुधारीत प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार

टेंभू योजनेसाठी १५५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून प्रत्यक्ष कामे मार्गी लागणार असल्याने अधिक फायदा होणार आहे. वास्तविक टेंभू योजना केंद्राच्या बळीराजा सिंचन योजनेत समाविष्ट असल्यामुळे केंद्र आणि राज्याचा निधी मिळून योजना मार्गी लागणार आहे. सहाव्या टप्प्याची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही बाबर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button