सांगली : शहराला सहा दिवस होणार कमीदाबाने पाणीपुरवठा | पुढारी

सांगली : शहराला सहा दिवस होणार कमीदाबाने पाणीपुरवठा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कृष्णा नदीपात्रात इंटेकवेल जवळील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्याचा परिणाम पाणी उपसावर झाला आहे. त्यामुळे शहरात सहा-सात दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. नदीपात्रातील पाणी वाहते नसल्याने पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सांगली पाटबंधारे विभागास कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याबाबत कळवले आहे. कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढविण्याबाबत विनंती केलेली आहे. नदीपात्रातील पाणी पूर्ववत होण्यासाठी 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना होणारा पाणी पुरवठा पुढील 7 दिवसापर्यंत कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. कृष्णा नदीपात्राचे पाणी वाहते नसल्याने पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातून विसर्ग सुरू : देवकर

सद्यस्थितीत टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही उपसा सिंचन योजनांचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरु आहे. कोयना विद्युत पायथागृहाव्दारे सोडण्यात येणारा विसर्ग अपूरा पडत आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सिंचन व पाणी अपुरे पडत आहे. सांगली पाटबंधारे विभागाने वारणा व कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याबाबत विनंती केली होती. मात्र वारणा धरणानजीक चिंचोली कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे दुरुस्ती काम सुरु असल्याने विसर्ग सोडता येणार नसल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने कळविले होते. 3 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

Back to top button