सांगली : रब्बी साधला; दर पडला | पुढारी

सांगली : रब्बी साधला; दर पडला

सांगली; मोहन यादव : हंगाम सुरू होण्याआधी गहू, हरभरा, मका, शाळूचे भाव कोसळण्याची शक्यता आहे. सरकारने लादलेली वायदेबंदी व सुरू केलेल्या आयातीचा फटका शेतकर्‍यांना बसण्याची चिन्हे आहेत. या विरोधात शेतकरी संघटनांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हंगाम सुरू झाल्यापासून कांद्याचे भाव कोसळत आहेत. सध्या कांद्याचा विक्रीदर प्रतिक्विंटल 450 ते 600 रुपयांपर्यंत कोसळला आहे. सरकारने मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च 850 ते 900 रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, आजमितीस कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 450 ते 600 रुपये भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गहू बाजारात येण्याआधीच भाव कोसळले

शेतकर्‍यांचा नवीन गहू बाजारात येण्याआधीच भाव पडू लागले आहेत. सरकारने 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. तर 20 लाख टन गहू पीठनिर्मिती उद्योगांना स्वस्तात विकला जाणार आहे. त्यामुळे गव्हाचे दर 500 रुपयांनी कोसळले आहेत. त्यातच सेबीने गव्हासह इतर आठ शेतमालांवर वायदेबंदीची मुदत वाढविल्याने भाव अजून पडू लागले आहेत.

हरभरा, शाळू, मक्याचे दर व्यापारी पाडणार

जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात हवामान चांगले आहे. थंडी चांगली पडल्याने रब्बी पिकांची वाढ जोमदार झाली आहे. रोग-किडीचा प्रादुर्भावही फारसा झाला नाही. यंदा जिल्ह्यात शाळूची 122391 हेक्टरवर (एकूण क्षेत्रांपैकी 97 टक्के), गव्हाची 18598 (86 टक्के), मक्याची 20462 (112 टक्के) हरभर्‍याची 23110 हेक्टर (97 टक्के) अशी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा हरभरा, शाळू, मक्याचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात उत्पादन बाजारात येेण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हरभर्‍याचे दर प्रतिक्विंटल 4 हजार ते 4500 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. चांगल्या दर्जाच्या हरभर्‍यास पाच हजार मिळत आहेत, पण पुढील 15 दिवसांत उत्पादन मोठे होणार असल्याने भाव कोसळण्याची शक्यता आहे. शाळूचा भाव किमान 3800 ते कमाल 4300 प्रतिक्विंटल आहे. मका भाव प्रतिक्विंटल 2300 रुपयांच्या जवळपास आहे, पण आवक वाढताच व्यापारी भाव पाडण्याची शक्यता आहे. या कमी भावाचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.

हमीभावापेक्षा 46 टक्के कमी दर

2022-23 मध्ये महाराष्ट्राने केंद्राला गव्हाची किंमत 3755 रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस केली होती, पण केंद्राने किमान आधारभूत किंमत 2015 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. म्हणजे 46.3 टक्के कमी केली. खतांचे दर, उत्पादन खर्च व महागाई भरमसाठ वाढत असताना भावात फक्त 1.10 रुपये प्रतिकिलो वाढ केली. युक्रेन-रशिया युद्ध, रुपयाचे अवमूल्यन व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गव्हाचे भाव चांगलेच वाढले असताना केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदी घातली व दर पाडले. सांगली जिल्ह्यात सध्या गव्हाचा भाव 2650 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल आहे. सरासरी भाव 3075 आहे. नवीन गहू बाजारात येताच हे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

1973 मध्ये डिझेल 84 पैसे प्रतिलिटर असताना गहू एक रुपया किलोस मिळत होता. म्हणजे डिझेलचे भाव 16 टक्केनी कमी होते. आज डिझेल 100 रुपये असताना गव्हाचा हमीभाव 21.25 रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. म्हणजेच आज डिझेलचे भाव गव्हाच्या तुलनेत जवळपास पाचपट पटीने वाढले आहेत. खते, औषधे, पाणी, मजुरी यातही तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावही भरमसाठ वाढले आहेत. याचा विचार करून सरकारने शेतीमालाचे हमीभाव वाढवावेत.
– उमेश देशमुख, प्रदेशाध्यक्ष, किसान सभा

Back to top button