सांगली : सरकारी दवाखान्यात रक्तासह इतर चाचण्या बंद | पुढारी

सांगली : सरकारी दवाखान्यात रक्तासह इतर चाचण्या बंद

इस्लामपूर; संदीप माने :  वाळवा तालुक्यात सरकारी दवाखान्यात घेतल्या जाणार्‍या रक्त व विविध चाचण्या गेल्या 20 दिवसांपासून बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. संबंधित प्रयोगशाळेकडून यंत्र खराब असल्याचे कारण देवून वेळ मारून नेली जात आहे. सरकारी दवाखान्यावर अवलंबून असलेल्या गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी सरकारी दवाखान्यात औषधांचा तुटवडा होता. नागरिकांच्या रोषानंतर काही दिवसांपासून बी.पी. (रक्तदाब), मधुमेहाची औषधे पुन्हा सरकारी दवाखान्यात मिळू लागली. रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता रक्ताच्या चाचण्या बंद झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

लिव्हर फंक्शन, थायरॉड, किडनीफंक्शन, रक्तातील लिपिड प्रोफाईल, कॅल्शियम, युरिक अ‍ॅसिड, संधीवात आदींच्या चाचण्या सरकारी दवाखान्यात केल्या जातात. तालुक्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रातून साधारणपणे दररोज 280, इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयातून 100 सॅम्पल तपासणीसाठी इस्लामपूर येथील खासगी प्रयोगशाळेकडे दिले जातात. मात्र गेल्या 20 दिवसांपासून संबंधित प्रयोगशाळेने तपासणी बंद केली आहे. त्यामुळे दररोज सुमारे 400 रुग्णांना याचा फटका बसत आहे. रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत एका चाचणीचे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Back to top button