सांगली : अपहृत तरुणाचा खून; मृतदेह जाळून हाडे नदीत टाकली | पुढारी

सांगली : अपहृत तरुणाचा खून; मृतदेह जाळून हाडे नदीत टाकली

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  बावची (ता. वाळवा) येथील अपहरण करण्यात आलेल्या ओंकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे (वय 23, सध्या रा. डांगे कॉलेजजवळ, आष्टा) या तरुणाचा खून करून मृतदेह जाळल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने आष्टा पोलिसांच्या मदतीने तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. सम्मेद संजय सावळवाडे (वय 26, रा. सावळवाडे गल्ली, आष्टा), भरत चंद्रकांत काटकर (वय 36, रा. कदमवेस, आष्टा) व राकेश संजय हालुंडे (वय 23, रा. आवटी गल्ली, आष्टा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी ; पंधरा दिवसांपूर्वी सम्मेद संजय सावळवाडे व ओंकार ऊर्फ छोट्या रकटे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून वरील तीन संशयित आरोपींनी दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास ओंकार रकटे यास येथील डांगे कॉलेजजवळील प्रल्हाद घस्ते यांच्या भाड्याच्या खोलीतून चारचाकीतून पळवून नेले होते. याबाबतची फिर्याद ओंकार याचा मित्र सूरज प्रकाश सरगर (वय 21, रा. शेळके मळा, आष्टा) याने आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांना तसेच एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांना या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबी व आष्टा पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सम्मेद सावळवाडे, भरत काटकर व राकेश हालुंडे या तिघांनी ओंकार रकटे याचे अपहरण केले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एलसीबी व आष्टा पोलिसांच्या पथकाने वरील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

परंतु, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, भरत काटकर याने सांगितले की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी सम्मेद सावळवाडे व ओंकार रकटे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आम्ही तिघांनी डांगे कॉलेजजवळील प्रल्हाद घस्ते यांच्या भाड्याच्या खोलीतून ओंकार याचे गाडीतून अपहरण केले होते. आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर लोकमान्य शाळेजवळ नेवून ओंकार यास दांड्यक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मफलरने गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर ओंकार याचा मृतदेह त्याच गाडीतून घालून येथील स्मशानभूमीत आणून मृतदेह जाळून टाकला. यानंतर मृतदेहाची राख व हाडे पोत्यात घालून मर्दवाडी (ता.वाळवा) येथे नेवून कृष्णा नदीत टाकल्याचे सांगितले. आज रविवारी पोलिसांनी याठिकाणी शोध घेतला परंतु काही मिळाले नाही. याप्रकरणी वरील तीन संशयित आरोपीवर अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आष्टा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

अटक केलेले तीनही संशयित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर आष्टा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Back to top button