अगोदर बारावीची परीक्षा दिली, नंतर केले वडिलांवर अंत्यसंस्कार! | पुढारी

अगोदर बारावीची परीक्षा दिली, नंतर केले वडिलांवर अंत्यसंस्कार!

जत; पुढारी वृत्तसेवा :  बारावीची परीक्षा सुरू आहे. रात्रंदिवस अभ्यास करून मुलगा परीक्षेला जात आहे. आयुष्याची परीक्षा सुरू असताना शुक्रवारी वडिलाचे निधन झाले. सकाळी गणिताचा पेपर होता. घरामध्ये दु:खाचे वातावरण. परीक्षा द्यायची का नाही, असा विद्यार्थ्यासमोर प्रश्न. पण अशा दु:खातही अगोदर पेपर देऊन मग वडिलांवर अंत्यसंस्कार केले. ही घटना शुक्रवारी उमदीपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावात घडली.

हुलजंती येथे कल्लाप्पा आबा रूपटक्के (वय 60) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. रूपटक्के यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे अंत्यविधीसाठी लोक जमा होत होते, दुसरीकडे मृत कल्लाप्पा रूपटक्के यांचा मुलगा तुकाराम याच्या बारावीचा गणिता पेपर सकाळी साडेदहा वाजता होता. ग्रामस्थ एकत्र आले. हुलजंतीचे माजी सरपंच गोविंद भोरकडे व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडत तुकारामला अखेर पेपर पाठवून दिले. मुलगा तुकाराम परीक्षा देऊन आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.

तुकाराम सोड्डी येथील एमपी मानसिंग विद्यालयात परीक्षेसाठी गेल्याची माहिती प्राचार्य बसवराज कोरे यांना दिली. परीक्षा होईपर्यंत अंत्यविधी दुपारपर्यंत ढकलण्यात आला. तुकारामने काळजावर दगड ठेवून गणितचा पेपर दिला. एकीकडे डोळ्यात अश्रू परंतु दुसरीकडे आयुष्याची परीक्षा या दुहेरी संकटात सापडलेल्या तुकारामने सोड्डी केंद्रावर गणिताचा पेपर दिला. पेपर झाल्यानंतर तुकारामने दुखद अंतकरणाने येऊन वडिलांचा अंत्यविधी केला.

Back to top button