येत्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना झुकते माप : कृषिमंत्री अब्दुल सत्तार | पुढारी

येत्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना झुकते माप : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकर्‍यांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे आहे. मला आताच जास्त बोलता येणार नाही; पण अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांना झुकते माप असेल, इतकेच मी सध्या सांगतो, अशी आश्वासक ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

दै.‘पुढारी’ माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे आयोजित पुढारी अ‍ॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचे कृषिमंत्री सत्तार यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्नावर लढा दिला. सरकार-कारखानदार आणि शेतकर्‍यांमध्ये त्यांनी समन्वय साधून ऊस दराचा प्रश्न सोडवला. त्यांना शेतकर्‍यांच्या वतीने मी धन्यवाद देतो, अशी कृतज्ञता मंत्री सत्तार यांनी व्यक्त केली.

पिकांचे वाण प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव या प्रदर्शनामुळे शेतकर्‍यांना मिळणार आहे. दै. ‘पुढारी’चे हे प्रदर्शन म्हणजे शेतकर्‍यांसाठी चालते-बोलते विद्यापीठच आहेे, अशा शब्दांत सत्तार यांनी प्रदर्शनाविषयी अभिमान व्यक्त केला.

ते म्हणाले, विविध कारणांमुळे होणार्‍या शेतीच्या नुकसानीची काळजी सरकारलाही आहे. शेतकर्‍याला उत्पादन घ्यायला खर्च किती येतो? त्यातून त्याला मिळतात किती? त्यासाठी त्यांना कर्ज का काढावे लागते? व्याज किती द्यावे लागते? असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्‍यांच्या मागे आहेत. या प्रदर्शनामधून त्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील, अशी खात्री आहे. त्यामुळे ‘पुढारी’च्या वतीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा सन्मानच करण्यात आला.

ते म्हणाले, पिकांवर पडणार्‍या रोगांवर मात कशी करावी, यासाठी सर्व कृषी विद्यापीठांमधून संशोधन सुरू आहे. विषमुक्त शेतीसाठी काय केले पाहिजे, त्याचा विचार करावा लागेल. विषयुक्त धान्याच्या परिणामापासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर भविष्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करावी लागेल.

शासनाने दहा हजार हेक्टर नापीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लाखो शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केलेल्या अनुदानाचा उल्लेख त्यांनी केला. सहा महिन्यांत शेतकर्‍यांना 12 हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. ही मदत करून सरकारने शेतकर्‍यांवर उपकार केले नाहीत; कारण शेतक री हाच खरा राजा आहे, असे ते म्हणाले.

दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रदर्शनाचा उद्देश शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे तंत्र दाखवण्याचा आहे. याचे कारण पीक पद्धती बदलली आहे. उसाऐवजी इतरही पिके शेतकरी घेतो आहे, त्याची माहिती या प्रदर्शनातून शेतकर्‍यांना होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदर्शनाचे सहप्रयोजक ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्युट्रियन्सचे संचालक दीपक राजमाने, प्रायोजक रॉनिक स्मार्टचे संचालक तानाजी पोवार, सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे चेेअरमन डॉ. रवींद्र आरळी, मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप, कृषी अधीक्षक प्रकाश सूर्यवंशी, कृषी विभागीय सहसंचालक बसवराज बिराजदार यांचा सत्कार दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रदर्शनातील सर्व स्टॉलधारकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पुढारी’ म्हणजे सत्यता

‘पुढारी’ म्हणजे सत्यता याचा अनुभव या प्रदर्शनामध्येही आला. या प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी मिरचीचेही पीक घेतलेले आहे. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून रोग पडला आहे. ही रोपे आयोजकांना काढूनही टाकता आली असती; पण त्यांनी ती तशीच ठेवली आहेत, या सत्यतेचा मंत्री सत्तार यांनी गौरवाने उल्लेख केला. पिकांवर रोग पडला, तर शेतकर्‍यांनी काय केले पाहिजे, याची माहितीही या प्रदर्शनात मिळेल, असे ते म्हणाले. रोग पडलेल्या रोपांची तपासणी करून रोगाबाबत संशोधन करा, अशी सूचना त्यांनी कृषी अधिकार्‍यांना मंचावरूनच दिली. या प्रदर्शनानिमित्त उभारलेले भाजीपाला आणि धान्याचे प्लॉट प्रदर्शन झाल्यानंतरही काढू नका. रोपांची पूर्ण वाढ होईपर्यंत लक्ष ठेवा, त्याच्या नोंदी ठेवा, अशी सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यात पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून सातत्याने केलेले आहे. शासनाचे कुठे काही चुकत असेल तर त्यांनी दाखवून दिले आहे. बी-बियाणे-खते याबाबतीत दै. ‘पुढारी’मधून सतत मार्गदर्शन केले जाते. कोणत्याही आंदोलनात समन्वयाची गरज असते. सरकार, शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय घडवून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये पद्मश्री प्रतापसिंह जाधवसाहेबांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष मिटवण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. लक्षात घ्या, सरकार-शेतकरी आणि कारखानदार आदी सर्व घटकांचाच त्यांच्यावर विश्वास आहे.

गिरणी कामगारांच्या संपाची आठवण

सरकार, शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्षावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी यशस्वी शिष्टाई केली, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. या शिष्टाईचे उदाहरण देताना सत्तार यांनी मुंबईतील गिरणी कामगारांचा संप आणि त्याच्या परिणामाचा उल्लेख केला. या संपामुळे कामगारवर्गाचे खूप हाल झाले, याविषयी त्यांनी दुःख व्यक्त केले. गिरणी कामगारांच्या संपावेळीही पद्मश्री प्रतापसिंह जाधवसाहेबांची शिष्टाई असती तर हाही प्रश्न मिटला असता, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.

Back to top button