सांगली : शासनाची 60 लाखाची फसवणूक; दोघांवर गुन्हा | पुढारी

सांगली : शासनाची 60 लाखाची फसवणूक; दोघांवर गुन्हा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सरकारकडून मिळालेल्या 60 लाखांच्या निधीत अपहार करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील पर्ल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या संचालकासह सचिवावर गुन्हा नोंद करण्यात आला. संचालक आयुब बाबासाहब मोमीन (50, रा. गवळी गल्ली, सांगली) व सचिव कुमार रघुनाथ पाल (रा. सांगली) अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी लेखापरीक्षक (श्रेणी दोन) प्रदीप विजय काळे यांनी बुधवारी, एक मार्चला फिर्याद दिली.

मागसवर्गीय व गरीब लोकांनी रोजगार उभा करावा यासाठी सरकारने 2012 मध्ये योजना जाहीर केली होती. त्यानुसार कसबे डिग्रज येथे पर्ल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज मागासवर्गीय सहकारी संस्थेला एक कोटी रुपये मिळाले. संचालक म्हणून संशयित आयुब मोमीन, तर सचिव म्हणून कुमार पाल काम पाहत होते. डिसेंबर 2012 ते जुलै 2022 या कालावधीत संशयितांनी संगनमत करून संस्थेची स्लॉटर हाऊसची निर्मिती करणे, स्लॉटर झालेले बिफ व इतर फळ-फुले व इतर उत्पन्ने खरेदी करून पॅकिंग करणे व मार्केटिंग करण्यासह उत्पादन करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रस्तावर सादर केला. त्यानुसार 59 लाख 78 हजार 572 रूपयांचा निधी प्राप्त झाला. संशयितांनी या निधीतील अपहार व गैरव्यवहार करून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कमा काढून घेतल्याचे लेखापरीक्षणात समोर आले. त्यानुसार शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड तपास करत आहेत.

Back to top button