सांगली : पुढारी अ‍ॅग्रीपंढरी कृषी प्रदर्शनाचे शिवार सजले | पुढारी

सांगली : पुढारी अ‍ॅग्रीपंढरी कृषी प्रदर्शनाचे शिवार सजले

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  विजयनगर-सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामागे जिल्हा कृषी विभागाच्या मैदानावर भाजीपाला, फुलझाडांचे हिरवेगार प्लॉट बहरले आहेत. निमित्त आहे पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे पुढारी – अ‍ॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचे.

कृषी क्षेत्रातील विविध नामांकित कृषी तंत्रज्ञान कंपनी आणि शेतकर्‍यांना एकमेकांशी संवाद साधता यावा आणि शेतकर्‍यांना नवे तंत्र समजावे यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दैनिक पुढारी महत्वाचा दुवा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. तीन मार्चपासून सांगलीत हे प्रदर्शन सुरू होत आहे. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. रौनिक स्मार्ट होम अप्लायन्सेस सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाचे यंदा तिसरे वर्ष आहे.

माती आणि पाणी परीक्षण मोफत

आपली माती आणि पाणी पिकांना वापरण्या योग्य आहे की नाही याची मोफत तपासणी ऑरबिट लॅबोरेटरिजकडून करून मिळणार आहेच, सोबत येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍यास भेटवस्तू देण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष प्लॉटस्

चाळीस एकरहूनही जास्त जागेवर हे प्रदर्शन होणार आहे. त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. देश-परदेशातील तीसवर पिकांसह प्रदर्शन घेऊन पुढारीने कृषी क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. यामधून शेतकर्‍यांना पिके कोणती घ्यावीत, खते कोणती वापरावीत, बियाणे आणि पिकांच्या जाती कोणत्या आहेत, त्याचे उत्पादन कसे जास्त घेता येऊ शकते हे दैनिक पुढारीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना समजणार आहे. त्यासाठी प्रदर्शन स्थळावर विविध कृषी प्लॉटस् तयार करण्यात आले असून आता ते बहरले आहेत. या प्लॉटस्मधून शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रांची माहिती प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. विकसीत केलेली भरघोस उत्पादन देणारी सर्व पिके या प्रदर्शनामध्ये शेतकर्‍यांना पाहता येतील. तसेच देश-परदेशातील तीस हून अधिक पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना पाहायला मिळेल. भाजीपाला तसेच फुलवर्गीय पिकांचा देखील यामध्ये समावेश आहे.

महत्वपूर्ण स्टॉल्स

खते, बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर – अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक पीक अंतर्गत अवजारे, मलचिंग पेपर, शेडनेट, पाईप अशा विविध प्रकारचे स्टॉल आहेत. या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. प्रदर्शनामध्ये पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन याचेही प्रदर्शन असेल. मत्स्यपालनमध्ये पाच प्रकारच्या प्रजाती प्रदर्शनात पाहता येणार आहेत. कुक्कुटपालनमध्ये हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती मिळणार आहे.

डॉग, कॅट शोचे आयोजन

प्रदर्शनामध्ये दि. 5 रोजी डॉग आणि कॅट शो आहे. कॅट शो मध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचे मांजर आणि डॉग शोमध्ये जर्मनीतून आणलेला बारा लाख रुपयांचा जर्मन शेफर्ड पहायला मिळेल. यासह अनेक चॅम्पीयन डॉग या शो मध्ये असतील. डॉग आणि कॅटस्च्या वेगवेगळ्या स्पर्धा होतील. या शो च्या बुकिंगसाठी संपर्क : स्वप्निल (9503679108).

Back to top button