सांगली : कवठेपिरानमध्ये 20 लाखांचा गांजा जप्त; चारजणांना अटक | पुढारी

सांगली : कवठेपिरानमध्ये 20 लाखांचा गांजा जप्त; चारजणांना अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कवठेपिरान (ता. मिरज) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी छापा टाकून 20 लाख रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. गांजासह दोन कार असा एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परराज्यांतून या गांजाची तस्करी केल्याचा संशय आहे. त्या द़ृष्टीने पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. आदिल नासीर शहापुरे (वय 33, रा. बाबर गल्ली, कोल्हापूर रस्ता, सांगली), सचिन बाबासाहेब चव्हाण (31, जिल्हा परिषद शाळेजवळ, कवठेपिरान), मयूर सुभाष कोळी (डी-मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली) व मतीन रफीक पठाण (31, राधाकृष्ण वसाहत, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (दि. 23) न्यायालयात उभे केले जाणार आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अंमली पदार्थाची तस्करी व त्याची विक्री करणार्‍या तस्कर व एजंटांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक कवठेपिरान परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस कॉन्स्टेबल आर्यन देशिंगकर यांना कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना रस्त्यावर हे चारही संशयित गांजा विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली.

पथकाने कवठेपिरान मार्गावर सापळा लावला. त्यावेळी दोन कार संशयितरित्या उभा होत्या. यामध्ये संशयित चौघे बसले होते. पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली. तथापि ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पथकाने दोन्ही कारची झडती घेतली. त्यावेळी तीन पोती सापडली. या पोत्यांची तपासणी केल्यानंतर यामध्ये गांजा सापडला. 102 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी हा गांजा परराज्यातून आणल्याची कबुली दिली. त्यांच्याविरूद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम कायद्यांतर्गत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या 102 किलो गांजाची 20 लाख 40 हजार रुपये किंमत आहे. गांजासह दोन कार (एमएच 10 बीएम-7833) व (एमएच 10 बीएम-4534) असा एकूण 28 लाख 90 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, आर्यन देशिंगकर, संदीप पाटील, जितेंद्र जाधव, संकेत मगदूम, अजय बेंदरे, गौतम कांबळे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुळापर्यंत जाऊन तपास होईल : शिंदे

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे म्हणाले, या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. गांजा तस्करीत परराज्यातील ‘कनेक्शन’ असण्याची शक्यता आहे. हा तपास ‘एलसीबी’चे पथकच करणार आहे. अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी केली जात आहे. गरज पडल्यास तपासासाठी बाहेर पथके पाठविली जातील.

Back to top button