सांगलीत एकास सव्वालाखाचा गंडा | पुढारी

सांगलीत एकास सव्वालाखाचा गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  ‘कॅब बुकिंग’ करण्याच्या नावाखाली मयुर मोहन निकम (वय 34, रा. माधवनगर रस्ता पंचशीलनगर, सांगली) यांना सव्वा लाखाचा गंडा घालण्यात आला. दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी रात्री अज्ञाताविरूद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयुर निकम यांच्या आई-वडिलांना कल्याण ते सांगली अशी कॅब बुकिंग करायची होती. यासाठी ते ऑनलाईन कॅब बुकिंग साईट पाहत होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणार्‍या संशयित व्यक्तीने कॅब बुकिंगसाठी 50 टक्के सवलतीमध्ये कॅब बुकिंग करू शकता, असे सांगितले. निकम यांनी बुकिंगसाठी होकार दिला. त्यानंतर संशयिताने निकम यांना एक लिंक पाठविली.
निकम यांनी त्या लिंकवर टोकन रक्कम 101 रुपये पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डिटेल्स् शेअर केले. मात्र हे डिटेल्स नामंजूर झाले. निकम यांनी संशयिताला फोन करून ही बाब सांगितली. यावर संशयिताने गुगल मीट या लिंकवर सहभागी होण्यास सांगून मोबाईल स्क्रिन शेअर करण्यास सांगितले. निकम यांनी शेअर केल्यानंतर संशयिताने निकम यांचे यापूर्वी मिळालेले क्रेडिट कार्डवरून एक लाख 20 हजार 640 रुपये काढून घेतले. रक्कम काढून घेतल्याचा निकम यांना मोबाईलवर मेसेज आला. निकम यांनी संशयिताला तातडीने संपर्क साधला. मात्र त्याचा मोबाईल बंद लागत होता.

निकम गेल्या चार महिन्यापासून संशयिताशी संपर्क साधत आहेत. परंतु त्याच्याशी संपर्क झालाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्यांना आले. त्यांनी रविवारी रात्री संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलिस तसेच सायबर क्राईम विभागही या प्रकरणाचा तपास करीत आहे. संशयिताच्या मोबाईलचे कॉले डिटेल्स काढले जात आहेत. ‘कॅब बुकिंग’च्या नावाखाली आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button