सांगली : जेनेरिक औषधांची डॉक्टरांनाच ‘अ‍ॅलर्जी’ | पुढारी

सांगली : जेनेरिक औषधांची डॉक्टरांनाच ‘अ‍ॅलर्जी’

कडेगाव; रजाअली पिरजादे :  दिवसेंदिवस महागड्या वैद्यकीय सेवेचा खर्च कमी करण्यासाठी जनरिक औषधे ही परवडणारी आहेत. परंतु डॉक्टरांनाच जेनेरिक औषधांची एलर्जी असल्याचे तालुक्यात निदर्शनास येत आहे. डॉक्टरांचा कल हा ब्रँडेड औषधे लिहून देण्याकडे असल्याने रुग्णांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात बारमाही सर्दी, ताप, खोकला आदी किरकोळ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असते. अनेक लोक बेरोजगार आहेत. त्यात दवाखान्यात खर्च करणे लोकांना कठीण झाले आहे. महागड्या औषधामुळे लोक त्रासले जात आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचा खर्च कमी करण्यासाठी ब्रँडेड औषधांना पर्याय म्हणून जेनेरिक औषधे सुचविणे शक्य आहे. पण डॉक्टर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देत नाहीत. दुकानात आलेल्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांच्या हातातील औषधांच्या चिठ्ठीवर ब्रँडेड कंपन्यांची नावे लिहिलेली असतात. जेनेरिक औषधे चिठ्ठीवर लिहून द्यावी, असा आग्रह रुग्णांना करता येत नाही. स्वस्तातील जेनेरिक औषधांची मागणी का केली नाही. याबाबत रुग्णांना विचारले असता त्यातील बहुतांश रुग्णांनी डॉक्टरांना आपण कसे सांगणार असे उत्तर दिले.

जेनेरिक हे स्वस्त आणि सहज मिळणारी औषधे आहेत. जेनेरिक ही इतर ब्रँडेड औषधापेक्षा निश्चितच स्वस्त असतात. या औषधाबद्दल जाणीवपूर्वक समाजामध्ये गैरसमज निर्माण केले जातात. जेनेरिक औषधांची वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचत आहे. त्यामुळे औषधांची मागणी वाढत आहे. परंतु अद्याप तालुक्यातील सर्वच लोकांना या स्वस्त औषधाबाबत माहिती नसल्याचे चित्र समोर आले आहे. तेव्हा या औषधाबबत शासनाने, आरोग्य विभागाने व सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर्स मंडळींनी लोकांना सांगणे गरजेचे आहे.

मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होणे गरजेचे

जेनेरिक औषधे हे शहरासह तालुक्यातील बहुतांश मेडिकलमध्ये उपलब्ध नाहीत. या औषधामध्ये संबंधित दुकानदारांना नफा कमी मिळतो हे सत्य असले तरी सामान्य व गोरगरीब जनतेसाठी जेनेरिक औषधे मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Back to top button