गहू, ज्वारी, तांदूळ, तेल... कशाचाच बसेना मेळ; पंधरा दिवसांत किलोमागे दहा रुपये वाढ | पुढारी

गहू, ज्वारी, तांदूळ, तेल... कशाचाच बसेना मेळ; पंधरा दिवसांत किलोमागे दहा रुपये वाढ

सांगली : नंदू गुरव : कधीकाळी मळणी झाल्यावर गाड्या आणि ट्रॉल्या भरून जुंधळ्याची, गव्हाची पोतीच्या पोती घरात यायची, पण आता दहा-वीस किलो गहू आणि चार किलो ज्वारीत महिनाभर घर चालवावं लागतं आहे. कोरोना आणि त्यानंतर दिवाळीनंतर धान्याचे वाढत गेलेले दर कमी यायला तयार नाहीत. गेल्या पंधरा दिवसांत धान्याचे दर किलोमागं दहा-वीस रुपयांनी वाढले आहेत. डाळीही महागल्या आहेत. जगणं महाग झालं आहे.

आपल्याकडं गहू पंजाब आणि मध्य प्रदेशातून येतो तर ज्वारी बार्शी आणि कर्नाटकातून येते. बाजरी हंगामी खाल्ली जाते. परिणामी, जिथून धान्य येतं तेथील परिस्थितीवर धान्याचे दर वर-खाली होतात. लोक साधारणपणे वर्षभरासाठी लागणारे घरगुती धान्य मार्च महिन्यात एकाचवेळी भरतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून धान्याचे दर वाढल्याने हा भरणाही थांबवलाच आहे. गहू आणि शेंगदाण्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. याचे कारण निर्यातीत असल्याचे मत व्यापारी सचिन गवंडी यांनी व्यक्त केले.

तांदूळ कितीतरी प्रकारचा आहे, त्या-त्या प्रकारानुसार त्याचे दरही आहेत. 20 रुपये किलोच्या जाडा तांदळापासून 100 रुपये किलोच्या दिल्ली राईसपर्यंत सार्‍याच तांदळाचे दर किलोमागे चार रुपयांनी वाढले आहेत. बाजरी 35 ते 45 रुपये किलोपर्यंत आहे. तांदळासारखेच गव्हाचेही अनेक प्रकार. प्रकारानुसार दर. लोकवण गहू 38 तर खपली गहू 55 रुपये किलो आहे. गहू किलोमागे 10 रुपयांनी महागला आहे. गव्हापेक्षा शाळू म्हणजे चपातीपेक्षा भाकरी सध्या महाग आहे. बार्शी शाळू 55 रुपये किलो आहे. 15-20 रुपयांनी दर वाढला आहे. डाळींचे दरही 100 रुपये किलो असे कडाडलेलेच आहेत. तेल मात्र दहा रुपयांनी कमी झाले आहे.

जीवनसत्त्वं म्हणजे चैनी

रोजच्या जेवणातून कडधान्ये संपलीच आहेत. दूध तब्बल 70-75 रुपये लिटर झालं आहे. रोजचा दुधाचा वापर कमी झाला आहे. दही-ताक-लोणी-तूप तर लांबची गोष्ट. फळं खाणं म्हणजे चैनी वाटावी, अशी परिस्थिती आहे. चिकन 240 किलो, मटण 680-720, सुरमई मासा 800 किलो, पापलेट 1000-1200 (दुप्पट वाढ झाली आहे.) अंडी-6-7 रुपयापर्यंत गेल्याची माहिती चेतक खंबाळे यांनी दिली. महाग धान्य घेतले तरी गेल्या काही महिन्यांपासून ते दळायचे दरही वाढले आहेत. 1 रुपया किलोवरून दळपाचे दर पाच रुपयांवर गेले आहेत. पाच किलो धान्य दळायला 25 रुपये मोजावे लागतात.

मध्यमवर्गीय पिचला

गरिबांच्या पोटाची काळजी सरकारनं मिटवली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेने दिलेल्या अंत्योदय योजनेच्या यादीत नाव असलं की, या योजनेखाली अशा लोकांना एका कार्डाला महिन्याला 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ, साखर मिळते. केसरी कार्डधारकांपैकी ज्यांनी 59 हजारपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला दिला आहे. आधारकार्ड लिंक केलं आहे, त्यांनाही माणशी 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळतात. पण ज्यांचं रेशनकार्ड शुभ्र आहे, त्यांना मात्र रेशनच्या धान्याचा लाभ एक किलोही मिळत नाही. असा मध्यमवर्ग प्रचंड मोठा आहे आणि तोच महागाईनं पिचून गेला आहे.

नवीन धान्य बाजारात

सर्वसाधारणपणे नव्याच्या पौर्णिमेपासून नवे धान्य बाजारात यायला सुरुवात होते. पण यंदा उशीर झाला आहे. दोन-तीन दिवसांपासून नवे धान्य यायला सुरुवात झाली आहे. हरभरा आला आहे. मार्चपासून लोक घरगुती धान्य भरायला सुरुवात करतात. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत धान्य बाजार तसा शांतच असणार आहे.

Back to top button