सांगली: विटा येथे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जन आक्रोश मोर्चा | पुढारी

सांगली: विटा येथे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जन आक्रोश मोर्चा

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतक ऱ्यांनी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आज (दि.१३) विट्यात जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात युवा नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शंकर मोहिते, संग्राम माने, कमळापूरचे सरपंच जयकर साळुंखे, मनोहर जाधव आदी सहभागी झाले होते.

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा मायणी रस्त्यावरून पालिकेसमोर आल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने इदाते यांच्याशी चर्चा केली. खानापूर तालुक्यातील कमळापूर, आळसंद, भाळवणी, बलवडी (भा.) आणि परिसरातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरणने पूर्व सुचना न देता तोडली आहेत. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अचानक पूर्व सूचना न देता शेती वीज जोडण्या तोडल्यामुळे ऊसपिके आणि अन्य शेती पिके करपू लागली आहेत. जनावरांचे पाण्याविना हाल होवू लागले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून परिसरातील वीज कनेक्शन तात्काळ जोडून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता इदाते यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. नविन उपकेंद्र मंजूर आहेत, त्यांचे काम लवकर सुरू करण्यात येईल. महावितरणची बिले दुरुस्त करण्याबाबत पुढील महिन्यात शिबिर आयोजित करणार असल्याचे कार्यकारी अभियंता इदाते यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या निवेदनावर गणेश जाधव, बाजीराव जाधव, हणमंत जाधव, शिवाजी जाधव, अशोक गोतपागर, शिवराम जाधव, युवराज जाधव, सुनिता गायकवाड, मानसिंग जाधव, रोहित जाधव, विनोद चव्हाण, सचिन जाधव, रमेश गोतपागर अभिजीत आडसुळे, संजय गोतपागर, अंकुश पोळ, हणमंत शिरतोडे, राजेंद्र गोतपागर यांच्या सह्या आहेत. यावेळी राधेशाम जाधव, सुरेखा जाधव, तुषार शिंदे, कृष्णात जाधव, प्रविण जाधव, प्रशांत पवार आदीसह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button