सांगली : पलुसमध्ये अपघाताचा बनाव करत वृद्धाचा खून | पुढारी

सांगली : पलुसमध्ये अपघाताचा बनाव करत वृद्धाचा खून

पलुस, पुढारी वृत्तसेवा : पलुस तहसिल कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे जाणाऱ्या पलुस पोलीस ठाण्यासमोर दि.२० जानेवारी रोजी वृद्ध विजय नाना कांबळे (वय-६५, रा.बांबवडे) यांना पाठीमागून इनोव्हा कारची जोराची धडक देऊन अपघात झाल्याचा बनाव करत खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. संग्राम राजेंद्र पाटील (वय २२, रा. भवानीनगर,वाळवा), रोहन रमेश पाटील (२४ रा.घोगाव), रुतीक भुपाल पाटील (२२, रा.घोगाव), सुनिल केशवराव घोरपडे (५२ वर्षे, रा. पलूस), अभयसिंह मोहनराव पाटील (४० रा. पलूस) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना पलूस न्यायालयात हजर केले असता १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मयत कांबळे हे २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या अज्ञात इनोव्हा कारने जोराची धडक देत गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेत पलुस पोलिसांनी विजय कांबळे यांना उपचाराकरीता मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले होते. सदर अपघाता बाबत प्रत्यक्ष पाहणारे जितेश सुरेश बनसोडे यांनी तक्रार दाखल केली होती. मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारदरम्यान कांबळे यांचा २१ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता.

सदरची झालेली घटना ही पोलीस ठाण्यासमोर झाल्याने गुन्हेगाराला शोधणे पोलिसांसाठी मोठी जबाबदारी होती. अपघात की खून हे स्पष्ट करण्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी गुन्हा घडल्यापासून पोलीस ठाण्याचा ,कुंडलकडे जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणाचा सिसिटीव्ही चेक केला. यामध्ये एक इनोव्हा गाडी बिगर नंबरची गेल्याचे स्पष्ट झाले. वाहणाचा शोध घेण्यासाठी सांगली ,कोल्हापूर येथे पथके पाठवली. तपासात इनोव्हा गाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शोध घेवून सदर वाहनाचा मालक निष्पन्न केला व त्यावरुन वाहनाचा नंबर एम एच.०९ डीएम ४०४१ असे स्पष्ट झाले. वाहन मालकाकडे तपास केला असता त्यांनी सदरचे वाहन सन २०२१ मध्ये इस्लामपूर हद्दीतील भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटील यास २ लाख रुपयास गहाण दिले होते असे निष्पन्न झाले.

संग्राम पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता पलुस येथील सुनिल घोरपडे, अभयसिंह पाटील यांचेशी संपर्क असलेचे तांत्रिक पुराव्यावरुन स्पष्ट झाले. मयत कांबळे तसेच अभयसिंह पाटील व सुनिल घोरपडे यांचेत बांबवडे येथील १२ एकर जमिनीचा वाद होता.कांबळे यांच्याकडे कुळाची जमीन होती. जमीनीच्या वादातुन व मयत कांबळे हे खोटे गुन्हे दाखल करतो म्हणुन त्यांनी संग्राम पाटील याला मयत कांबळेला उचलून नेणे किंवा वाहणाची धडक देणे यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिली होती.संग्राम पाटील व त्याचे मित्र रुतीक पाटील, रोहन पाटील यांनी दि.२० जानेवारी रोजी मयत कांबळे हे कोर्टात कामाकरीता आलेवर त्यांचेवर पाळत ठेवुन होते. कोर्टातुन काम आटोपून पायी चालत जात असताना त्यांना वरील इनोव्हा कारने पाठीमागुन धडक देवून त्यांचा खुन केला आहे. त्यामुळे हा अपघात नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचंलत का?

Back to top button