पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे ज्वर आता वाढण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. यात कोणाला हेलिकॉप्टर, हिरा, बासरी, शिट्टी आणि बुद्धिबळाचा पटही मिळाला आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांनी चिन्हांसह आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
शुक्रवारी कसबा पेठ मतदारसंघातील सोळा उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. त्यात नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना हात तर भाजपचे हेमंत रासने यांना कमळ चिन्ह मिळाले आहे. तर निवडणुकीच्या मैदानात उडी घेणार्या 14 उमेदवारांना विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय मराठा पार्टीचे रवींद्र वेदपाठक यांना हेलिकॉप्टर, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे बलजित कोचर यांना ऊस शेतकरी असे चिन्ह मिळाले आहे. सैनिक समाज पार्टीचे तुकाराम डफळ यांना संगणक, अपक्ष उमेदवार अनिल हतागळेंना हिरा, अभिजित बिचकुले यांना कपाट, अमोल तुजारेंना गॅस सिलेंडर, आनंद दवे यांना बासरी, अजित इंगळे यांना शिट्टी, सुरेश ओसवाल यांना बुद्धिबळाचा पट, खिसाल जलाल जाफरी यांना सात किरणांसह पेनाची निब, चंद्रकांत मोटे यांना कप-बशी, रियाज सय्यद आली यांना चपला, संतोष चौधरी यांना सफरचंद, हुसेन नसरोद्दिन यांना दुर्दशन अशी चिन्हे मिळाली आहेत.