नवरा आला मांडवापाशी.. नवरी पळाली पैशानिशी | पुढारी

नवरा आला मांडवापाशी.. नवरी पळाली पैशानिशी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : लग्न लावून नवरदेवांची 3 लाख 60 हजारांची फसवणूक करणार्‍या टोळीचा इस्लामपूर पोलिसांनी पर्दापाश केला. टोळीतील एका महिलेसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला, मालेगावनजीक लग्नाचे आमिष दाखवून लग्न लावून देत आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला , बार्शी भागातली घटना. नवरदेव आले, लग्नाची जोरदार तयारीही झाली, पण वधुंचा पत्ताच नाही, चक्क 200 लग्नाळू पोरांची फसवणूक उघडकीस.

विवाह संकेतस्थळावर वधूच्या मागणीसाठी नाव नोंदणी केलेल्या एका तरूणाला एका भुरट्या तरुणीने संपर्क केला. विवाह करणार असल्याचे आमिष तरुणाला दाखविले. यातून ओळख वाढवून तरुणाकडून महिनाभरात विविध कारणे देऊन 14 लाख 96 हजार रुपये उकळले. लग्नाचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्याचा धंदा आज जोमात सुरू आहे. अनेक कारणांनी मुला मुलींची लग्ने लांबत चालली आहेत. मुलांसमोर हा प्रश्न गंभीर होत आहे. चाळीशी आली तरी लग्नाचा योगच येत नसल्याच्या निराशेत हजारो युवक अडकले आहेत. अशा युवकांना हेरून त्यांना हातोहात फसवणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मजबुरीचा फायदा घेत, भावनांशी खेळत मुलाला आणि मुलाकडच्या मंडळींना लाखोंचा चुना लावणार्‍या या टोळ्यात महिलाही सहभागी आहेत.

फसवणूक झालेल्याचं फक्त आर्थिक नुकसानच होतं असं नाही तर त्यांना अपमानाला सामोरं जावं लागतं. ते थट्टेचा विषय बनतात. काहींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. ही फक्त आर्थिक नाही तर भावनिक आणि सामाजिक फसवणूक आहे. जुन्या पद्धतीनं नात्यातील, माहितीतीला मुला-मुलीशी विश्वासू मध्यस्थ, नातेवाईक यांच्या ओळखीनं लग्नं जुळवली जायची. दिवस बदलले. नातेसंबंधही द़ृढ राहिले नाहीत. माणसं नोकरी-व्यवसायासाठी गाव-नातेवाईकांपासून लांब गेली आणि याचा परिणाम लग्न जुळवण्यावरही झाला. लग्न जुळवणं हा मार्केटिंगचा, पैसा कमवायचा व्यवसाय झाला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, वेबसाइट, वधू-वर मेळावे, लग्न जमविणारे दलाल म्हणजेच एजंट यांचा सुळसुळाट झाला. कसली, काहीही पार्श्वभूमी माहिती नसताना लग्नं जुळायला लागली. त्यातली काही यशस्वी झाली आणि बरीच फिसकटली. लग्नाचं वय उलटून गेलेली, नोकरी-व्यवसायात स्थिर नसलेली, रंगरूपानं डावे असलेली, घटस्फोट-विधवा-विधूर असलेली माणसं फसवली जात आहेत. हे प्रकार वाढू लागले आहेत.

शुभमंगल? सावधान…

शहानिशा केल्याशिवाय, खात्री पटल्याशिवाय, विश्वासू मध्यस्थाशिवाय लग्न जुळवू नये. जास्तीत- जास्त पुरावे, माहिती, संबंधित लोकांचे फोटो, कागदपत्रे, रजिस्ट्रेशन पडताळून पाहावेत. अशा संस्था, संघटना, व्यक्ती यांचे नोंदणी प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे मागून घ्यावेत. त्यांनी शिफारस केलेल्या स्थळ अथवा वधू यांचेदेखील जन्मदाखला, फारकत असल्यास त्याचे कागदपत्रे, विधवा-विधूर सांगितले असल्यास त्याचा पुरावा, मुले असल्यास त्यांचे पुरावे तसेच त्या स्थळाचा इतिहास, पार्श्वभूमी जाणून घ्यावी. संबंधित मुलगी अथवा मुलाचे मूळ गाव, इतर नातलग, शिक्षण, नोकरी व्यवसाय याची शहानिशा करावी. विवाह नोंदणी कार्यालयात लग्नाची नोंदणी करावी. अशा लग्नानंतर फारकत घेण्यासाठी दबाव आलाच तर कोर्टामार्फतच फारकत घ्यावी. सतर्क राहावे. या गोष्टी गरजेच्या आहेत.

Back to top button