सांगली : ‘मार्च एंडिंग’मुळे वाढला ‘सावकारी जाच’! | पुढारी

सांगली : ‘मार्च एंडिंग’मुळे वाढला ‘सावकारी जाच’!

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध सावकारीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांची दिवसाढवळ्या लूटमार सुरू आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून आजपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. सावकारांना कायद्याचा धाक वाटत नसल्याने त्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मार्च एंडिंग तोंडावर असल्याने सावकार वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करीत आहेत. त्यामुळे अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. कमी भांडवलात भरमसाठ रक्कम उकळता येत असल्याने गल्ली-बोळात आज सावकार तयार झाले आहेत. दरमहा 20 ते 30 टक्क्यांपर्यत व्याजाची वसुली करून कर्जदारांना अक्षरशः भिकारी करण्याचा उद्योग सुरू आहे.

जिल्ह्यात अवैधरीत्या सावकारी करणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अवैध सावकारीचा धंदा करणारे काहींजण व्याजापोटी आधीच कोर्‍या धनादेशावर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतली जाते. ठराविक कालावधीचा शेत, जमिनी याबाबत दोघांमध्ये करार केला जातो. व्याजाची रक्कम थकल्यास सावकारांकडून शिवीगाळ केली जाते. संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. ठरलेल्या वेळेत पैसे आले नाहीत तर ती जमीन, शेती स्वतःच्या नावावर करून घेतली जाते. जिल्ह्यात अवैध सावकारीतून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.

वसुलीसाठी गुंडांची नेमणूक

कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. जोपर्यंत तारण ठेवलेली वस्तू पदरात पडत नाही, तोपर्यंत सावकाराचे व्याज थांबतच नाही. वसुलीसाठी अनेक सावकारांनी गुंडांची नेमणूक केली आहे. वसूल केलेल्या रकमेतील काही रक्कम त्यांना देण्यात येते. कर्जाचे हप्ते न दिल्यास संबंधित कर्जंदारास अतिशय वाईट वागणूक दिली जाते. त्यामुळे कर्जदार भीतीपोटी सावकार म्हणेल तसे, सांगेल तसे निमूटपणे सर्व काही सहन करतात. भीतीपोटी तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. काहींनी धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली, तर पोलिस पुरावा मागतात. अलीकडे सर्वच क्षेत्रात सावकारी बोकाळली आहे. शेतकरी, रिक्षाचालक, व्यापारी, भाजी विक्रेते, कामगार, मजूर, मटका खेळणारे, व्यसनाधीन लोक सावकारांच्या पाशात अडकत चालले आहेत. आज काहीही कामधंदा न करता अनेकजण सावकारीच्या जोरावर करोडपती झाले आहेत. गळ्यात सोनसाखळी, हातात सोन्याचे कडे अशा थाटात फिरणार्‍यांनी फ्लॅट, शेती, बंगले, गाडी अशा अनेक ठिकाणी संपत्तीची गुंतवणूक केली आहे. या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

फळ, भाजीपाला विक्रेत्यांना दिवसांवर दिले जातात पैसे

शहरात भाजी, फळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. अनेक विक्रेते शहराबाहेरून उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. अनेकांकडे व्यापार करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. त्याचा गैरफायदा घेऊन सावकार त्यांना दिवसावर व्याजाचे पैसे देतात. एक हजार रुपयांना दिवसाला शंभर रूपये व्याज आकारले जाते. आदल्या रात्री पैसे दिले जातात. दुसर्‍या दिवशी व्याजासहित मूळ रक्कम घेतली जाते.
मार्च एंडिंगमळे सावकार कर्जदारास खूप त्रास देत आहेत. त्यामुळे अवैध सावकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

भिशीमार्फ त चालते मोठी सावकारी

जिल्ह्यात, मंडळे, बचत गट, संघटना यांच्यामार्फत भिशी चालवली जाते. तरुण मंडळ, बचतगट एकत्र येऊन भिशी स्थापन केली जाते. त्यापैकी काही भिंशींतून आठवड्याला पैसे देतात. त्याची आकारणी 20 ते 30 टक्के आहे. एखाद्या आठवड्यात हप्ता चुकला, तर चक्रव्याज लावण्यात येते. दहा हजार ही मूळ कर्जाची रक्कम असेल आणि चार ते पाच हप्ते थकले, तर ती रक्कम सुमारे 50 ते 60 हजारांच्या घरात जाते.

काही दुकानांत चालते अवैध सावकारी ?

जिल्ह्यात काहीजणांकडे सावकारीचा परवाना आहे. त्यापैकी काहीजण दागिने गहाण ठेवून लोकांना कर्ज देतात. अनेकजण व्याजाची आकारणी नियमानुसार करण्यात येत नसल्याचे चर्चा आहे. केवळ कागदोपत्री नियमानुसार आकारणी दाखविली जाते; मात्र प्रत्यक्षात जादा दराने व्याज आकारणी केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याचा मुळाशी जाऊन पोलिसांनी तपास करण्याची मागणी होत आहे.

Back to top button