सांगली : वॉनलेस रुग्णालयाच्या आंदोलक कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

सांगली : वॉनलेस रुग्णालयाच्या आंदोलक कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

मिरज; पुढारी वृत्तसेवा : थकीत पगार मिळण्यासाठी गेल्या 88 दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या वॉनलेस रुग्णालयाच्या कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. शरद भोरे असे त्या कर्मचार्‍याचे नाव आहे. रुग्णालयाचे डायरेक्टर व रुग्णालयातील अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

थकीत पगार मिळण्यासाठी वॉनलेस रुग्णालयातील काही कर्मचारी गेल्या 88 दिवसांपासून रुग्णालयाच्या गेटजवळ आंदोलन करीत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्या रुग्णालय प्रशासनाकडून मान्य करण्यात येत नव्हत्या. शरद भोरे या रुग्णालय कर्मचार्‍यास वॉनलेस रुग्णालयाच्या दरवाजातच हृदयविकाराचा झटका आला. त्या कर्मचार्‍याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यामुळे जोपर्यंत वॉनलेस रुग्णालयाच्या डायरेक्टर व अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. रात्री उशिरा मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी यावेळी घेतला आहे.

Back to top button