सांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू | पुढारी

सांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू

विटा : पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांचा थकीत पगार आणि इतर देणी देण्याचा प्रश्न येत्या दोन दिवसांत सोडवा. अन्यथा सोमवारपासून (दि.६) तीव्र लढा उभा करू, असा इशारा शेकाप, भाजप आणि शेतकरी सेनेने दिला आहे.

विट्याच्या महसूल भवनासमोर यशवंत कारखान्याच्या कामगारांचे थकित पगार आणि अन्य देण्याच्या प्रश्नावरून गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज (दि.३) तिसरा दिवस होता. आज दुपारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. सुभाष पाटील, शेतकरी सेनेचे नेते भक्तराज ठिगळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास पाटील, अॅड सुरेश पवार, अॅड विजय सुर्यवंशी यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत साखर कारखाना कामगारांची देणी थकीत असताना या कारखान्याची लिलाव प्रक्रिया झाली. या लिलाव प्रक्रियेतून कामगारांची थकीत पगार देण्यासाठी अंदाजे आठ कोटी २८ लाख रूपये जिल्हा बँकेत जमा करण्यात आले आहेत. एक एप्रिल २०१२ पासून जिल्हा मध्यवर्ती बँक सदरची रक्कन वापरत आहे. त्याचवेळी कामगारांना थकीत पगार अदा केला असता, तर कामगार आणि त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली नसती. लिलाव प्रक्रिया झाल्यापासून आज अखेर पर्यंतची व्याजासकट सकम कामगारांना दिली गेली पाहिजे अशी आंदोलनकर्त्या साखर कामगारांची मागणी आहे.

दरम्यान शनिवारी आंदोलनकर्ते आणि जिल्हा बँक यांच्यात समन्वय साधण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. सुभाष पाटील, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button