सांगली : पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार  | पुढारी

सांगली : पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील स्वरूप चित्रमंदिरनजीक दसरा चौकातील अल्पवयीन मुलीवर पोलिस हवालदारानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. स्वप्निल विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे या पोलिसाचे नाव आहे. तो विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी 17 वर्षांची आहे. ती दसरा चौकातील ‘रेड लाईट’ एरियात राहते. 2022 मध्ये संशयित कोळी मुलगी राहत असलेल्या खोलीत गेला. त्याने तिला धमकाऊन दोन वेळा अत्याचार केला. तू ‘रेड लाईट’मध्ये राहतेस. तुला इथं राहता येणार नाही. जर तुला इथं रहायचं असेल तर तुला पैसे द्यावे लागतील’, असे म्हणून तिच्याकडे खंडणीची मागणी केली. मुलीने हा प्रकार एका सामाजिक संस्थेला सांगितला होता. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. अधिकार्‍यांनी या पोलिसाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

गेल्या सहा महिन्यांपासून त्याची चौकशी सुरू होती. यामध्ये तो दोषी आढळून आला. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पीडित मुलीची मंगळवारी रात्री फिर्याद घेऊन कोळीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने कोळीला रात्री उशिरा अटक केली. या प्रकारामुळे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली गेली. प्रसारमाध्यमांपासून ही बातमी लपविण्याचा प्रयत्न केला.

कोळीला बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आलेे. न्यायालयाने त्याला दि. 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याला शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक अजित टिके तपास करीत आहेत.

खंडणी घेतली

पीडित मुलगी पश्चिम बंगालची आहे. तिने इथे वेश्या व्यवसाय करावा, यासाठी कोळीने तिच्याकडून आतापर्यंत सात लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये एका पोलिस अधिकार्‍याचाही हात असल्याचे समजते. या अधिकार्‍याची चौकशीही लागली आहे.

Back to top button