सांगली : दीड लाख रुपयांची लाच घेताना लिपिक जाळ्यात | पुढारी

सांगली : दीड लाख रुपयांची लाच घेताना लिपिक जाळ्यात

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महारवतन जमिनीची विक्री करण्यासाठी जमीन मालकास परवानगी देण्याकरिता दीड लाखाची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडील कुळवहिवाट शाखेतील अव्वल लिपिक अनंता विठ्ठलराव भानुसे (वय 59, रा. क्रांतीनगर, विजयनगर, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणार्‍या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई याला लाच देण्यास प्रोत्साहित केले म्हणून ताब्यात घेतले आहे. महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरिष्ठांना सांगून मंजूर करून देण्यासाठी स्वत:करिता व वरिष्ठांना देण्याकरिता दोन लाखांच्या लाचेची मागणी संशयित भानुसे यांनी केली होती.

याबाबत दि. 19 जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी तक्रार केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचे आढळले. तसेच रोहयोमधील लिपीक दिलीप देसाई यांनी तक्रारदार यांना भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान अनंता भानुसे हा दोन ऐवजी दीड लाखाची लाच तक्रारदाराकडून घेण्यास तयार झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृह आवारात भानुसे याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. तसेच लिपीक दिलीप देसाई यास ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button