सांगली : शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरण; विपूल पाटीलसह चौघे उच्च न्यायालयात शरण | पुढारी

सांगली : शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरण; विपूल पाटीलसह चौघे उच्च न्यायालयात शरण

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली जिल्ह्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात शेअर्स मार्केटिंगच्या नावाने सुमारे 350 कोटी रुपयांचा घोटाळा करून रातोरात गायब झालेला पिनॉमिक ट्रेडर्सचा संचालक विपूल पाटीलसह चौघे मुंबई उच्च न्यायालयात शरण गेले आहेत. न्यायालयाने त्यांना दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत सांगलीत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या अंतिम अटकपूर्व जामिनावर दि. 7 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी ठेवली आहे.

विपूल पाटील, संतोष घोडके, सुधाकर पाटील व अभिजित जाधव (चौघे रा. तासगाव) अशी न्यायालयास शरण गेलेल्या संशयितांची नावे आहेत. विपूल पाटील हा मुख्य संशयित आहे. त्याने शेअर्स मार्केटिंगच्या नावाने पिनॉमिक ट्रेडर्स ही कंपनी स्थापन केली. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कंपनीच्या सहा शाखा उघडल्या. गुंतवणूक रकमेला दहा महिन्यांत दामदुप्पट परतावा दिला जाईल, असे त्याने आमिष दाखविले. या आमिषाला पश्चिम महाराष्ट्रातील 16 हजार 513 गुंतवणूकदार बळी पडले. शेतजमीन, घर, फ्लॅट व दागिने विकून गुंतवणूकदारांनी लाखो रुपये गुंतविले. काही दिवस त्याने परतावा दिला, पण कंपनीने गाशा गुंडाळला.

गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुमारे 16 हजार 515 तक्रारी दाखल झाल्या. यातून विपूल पाटील व त्याच्या साथीदारांनी सुमारे 350 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होताच पाटील साथीदारांसह पसार झाला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. तासगाव पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात संशयितांच्या केवळ दोन लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. दोन महिन्यापूर्वी गुंतवणूकदारांनी पाटीलच्या तासगाव येथील घरासमोर आंदोलनही केले होते. दोन दिवसापूर्वी पाटीलसह चौघे मुंबई उच्च न्यायालयात शरण गेले. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत सांगलीत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचा आदेश दिला आहे.

या दरम्यान पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची सूचनाही केली आहे. चौघांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर अंतिम सुनावणी दि. 7 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पाटीलसह चौघांनी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी दिली. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी केली.

घोटाळ्याची मालिकाच!

विपूल पाटीलने सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम घोटाळा केला. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करीत त्याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत हजारो गुंवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.

Back to top button