सांगली : बाबा… नका पिऊ दारू; मुलाच्या हट्टाने ते झाले व्यसनमुक्त | पुढारी

सांगली : बाबा... नका पिऊ दारू; मुलाच्या हट्टाने ते झाले व्यसनमुक्त

जत शहर; दादासाहेब सय्यद : भल्या भल्यांना दाद न देणारी माणसं आपल्या मुलाच्या बालहट्टापुढं गुडघे टेकतात. भलेही ती जगाला जुमानत नसतील, पण आपल्या मुलाच्या आग्रहापुढे शरण जातात. लहान मुलाच्या निरागसतेची ही ताकद सगळ्या तत्त्वांपेक्षा, उपचारांपेक्षा हजार पटीने मोठी असते, याचा सुखद अनुभव समाजाने घेतला. बाबा, आजपासून दारू बंद.. असा हट्ट मुलांनी केला आणि तब्बल ४० कुटुंबातील पुरुषांनी दारू सोडली.

घरचा कर्ता पुरुषच दारूच्या नादी लागला तर साऱ्या घराची राखरांगोळी होते. पालकांच्या व्यसनाचा परिणाम थेट त्यांच्या मुलांवरही होतो आणि मुलांचं बालविश्व उद्ध्वस्त होतं. या लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी आजवर अनेक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्याचा व्यापक परिणाम काही दिसून आला नाही. आता या पलीकडे जाऊन जर मुलांनीच व्यसन सोडा असा हट्ट पालकांकडे धरला तर पालक दारू, तंबाखू, माव्याची व्यसनं सोडतात, अशी उदाहरणे समाजासमोर येत आहेत. नेमका हाच धागा पकडत सांगलीच्या जत तालुक्यातल्या पांडोझरी या गावात जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून व्यसनमुक्तीचा एक अनोखा पॅटर्न राबवला. लहान मुलांनीच आपापल्या घरात सलग पाच वर्षे राबवलेल्या या मोहिमेमुळे तब्बल ४० कुटुंबातील पुरुषांनी व्यसनमुक्तीचा मार्ग धरला.

ही कांती आहे व्यसनमुक्तीची

पाच वर्षांपूर्वी बाबर वस्तीतल्या शाळेतील शिक्षक आणि मुलांनी व्यसनमुक्तीची चळवळ हाती घेतली. घरोघरी शिक्षक आणि मुलांनी जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. मुलांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखल्या. विद्यार्थ्यांनी दारू, विडी – सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी का प्रकारे हानिकारक आहे, हे समजून सांगितलेच, पण या मुलांनी आपल्या वडिलांकडे, घरातल्या व्यसनाधीन बनलेल्या नातेवाईकांकडे व्यसन सोडण्याचा हट्ट धरला. व्यसन करणारे वडील असो किंवा आजोबा, त्यांना ही मुले व्यसन कसे वाईट आहे, हे पटवून देऊ लागली. तरीही वडील, आजोबा व्यसन सोडत नाहीत म्हटल्यावर न जेवण्याचे आणि न बोलण्याचे अस्त्र बाहेर काढले आणि मग मात्र ही माणसं पाघळली.

त्यांचा नाईलाज होऊ लागला आणि मुलांच्या चेहन्याकडे आणि त्यांच्या हट्टाकडे पाहून अनेक पालकांनी मग दारू, तंबाखू, गुटख्याचा नाद सोडायचा निर्णय घेतला. अखेर शिक्षक आणि मुलांच्या पाच वर्षांच्या तपश्चर्येला चांगली फळं आली. वडील, आजोबांनी व्यसन सोडले. फक्त मुलांच्या हट्टामुळे….

Back to top button