सांगली : शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन; खानापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Video) | पुढारी

सांगली : शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन; खानापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Video)

विटा : पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले नायब सुभेदार जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर आज (दि. २१) दुपारी खानापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देत त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांचे मोठे बंधू मोहन भगत यांनी मुखाग्नी दिला. साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, माजी आमदार सदाशिव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे आदी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग भगत जम्मू काश्मीरमधील सियाचीन प्रांतातील बॉर्डरवर देशसेवेत तैनात होते. १४ व १५ जानेवारी रोजी झालेल्या बर्फवृष्टीत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना चंदीगड मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयसिंग भगत यांचे निधन झाल्याचे समजताच खानापूर शहरात शोककळा पसरली होती.

शनिवारी (दि.२१) सकाळी ९ च्या सुमारास त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनांनी खानापूर शहरात आणण्यात आले. त्यानंतर खानापूर शहरातून ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी जयसिंग भगत यांच्या पत्नी व मुलगीने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. उपस्थितीत सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटले.

गोरेवाडी रस्त्यावरील भगत मळा परिसरात त्यांना लष्कर व पोलीस दलाच्या जवानांनी अंतिम सलामी दिली. मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील, तसेच २२ मराठाचे कमांडिंग ऑफिसर, स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूर, कर्नाटक व केरळ एरिया ऑफिसर, दक्षिण भारत एरिया ऑफिसर, दक्षिण कमांडर, चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. शहीद नायब सुभेदार जयसिंग भगत यांना लष्कर, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पोलीस, शासकीय अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button