सांगली-पेठ रस्त्याचा कामास २७ रोजी केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार शुभारंभ | पुढारी

सांगली-पेठ रस्त्याचा कामास २७ रोजी केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार शुभारंभ

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली – पेठ रस्त्याचा प्रारंभ शुक्रवार दि. 27 जानेवारीरोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आष्टा येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुुरू केली आहे. दरम्यान, या रस्त्यासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेली 611 कोटींची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने 596 कोटी 29 लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. दि. 10 मार्चपर्यंत निविदा भरता येणार असून 13 मार्चरोजी ती उघडण्यात येणार आहे.

सांगलीला महामार्गाशी जोडण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. त्याप्रमाणे चार वर्षापूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्राकडे हस्तांतर करण्यात आला. सांगलीला महामार्गाशी जोडले गेले नाही. मात्र या रस्त्यातील खड्ड्यामुळे या मार्गाची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. येथील सर्वपक्षीय कृती समितीने रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले. दि. 3 जानेवारीला दिल्ली येथे केंद्रीय आर्थिक समितीने या रस्त्याच्या कामासाठी 881 कोटी 87 लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती ना. गडकरी यांनी जाहीरपणे सोशल मीडियावरून दिली होती.

दरम्यान, या रस्त्याची या पूर्वी काढलेली निविदा रद्द करून पुन्हा नव्याने 17 जानेवारीला काढण्यात आली आहे. त्याशिवाय त्या पुढील 10 वर्षे त्या ठेकेदाराने त्याची देखभाल व दुरुस्ती करणेही बंधनकारक आहे. या रस्त्याला प्राधिकरणामार्फत टोल आकारणी होणार आहे. त्याशिवाय या रस्त्यासाठी ‘ईपीसी’ निविदा प्रक्रिया असेल.

असा असेल महामार्ग

चारपदरी रस्त्याची दोन्हीकडे प्रत्येकी साडेसात मीटर रुंदी असणार आहे. मधोमध 0.60 मीटरचा दुभाजक असणार आहे. एकूण दहा ठिकाणी लहान-मोठे पूल होणार आहेत. तेथे फक्त सेवा रस्त्यासाठी भूमी संपादन होणार आहे.

अधिक वाचा : 

Back to top button