श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी न केल्यास थेट कारवाई; पशुसंवर्धन विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश | पुढारी

श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी न केल्यास थेट कारवाई; पशुसंवर्धन विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश

सांगली; स्वप्निल पाटील : श्वान प्रजनन केंद्र व पेटशॉपची नोंदणी न केलेल्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना दिले आहेत. या आदेशामुळे नोंदणी नसलेले श्वान प्रजनन केंद्र व पेटशॉप चालकांचे धाबे दणाणले आहे.

राज्यात अनेक जण श्वान प्रजनन केंद्राच्या माध्यमातून श्वानांचा व्यवसाय करतात. अनेक श्वान मालकांकडे पुरेशी जागा उपलब्ध नसताना देखील त्यांच्याकडून श्वान प्रजनन केंद्र चालविले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची नोंदणी न करता श्वान प्रजनन करून अवैधरित्या प्राण्यांची विक्री केली जात असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार श्वान प्रजनन करण्यासाठी नोंदणी करून घेण्याचे आवाहन सर्व जिल्ह्यातील पशुसंवर्धन उपायुक्तांनी श्वानप्रेमींना केले होते. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. राज्यात ज्या श्वान मालकांकडून पशुसंवर्धन विभागाच्या अटींची पूर्तता करून श्वान प्रजनन केले जाते, त्यांच्याकडून नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने केंद्रास भेट देऊन पाहणी करून अटींची पूर्तता होत असल्यास संबंधित श्वान मालकांना प्रजनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

परंतु अटींची पूर्तता होत नसल्याने अनेक श्वानमालकांनी प्रजनन केंद्र नोंदणी करण्यास अर्जच केले नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आले आहे. श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी करण्यास श्वानमालकांना जवळपास दहा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. परंतु तरीदेखील नोंदणी करण्यास अत्यल्प प्रतिसाद असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे.

Back to top button