सांगलीत गुंतवणुकीच्या आमिषाने 56 लाखांचा गंडा | पुढारी

सांगलीत गुंतवणुकीच्या आमिषाने 56 लाखांचा गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  गुंतवणूक रकमेला प्रतिमहिना आठ ते दहा टक्क्यापर्यंत परतावा देण्याच्या आमिषाने कवठेपिरान (ता. मिरज) व रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील तिघांना 56 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक अशोक चव्हाण, कविता दीपक चव्हाण व अर्जुन बाळकृष्ण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अशोक शामराव साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी 2021 मध्ये पूर्वी असोसिएटस् ऑनलाईन क्रिप्टो ट्रेड व ऑफलाईन सर्व्हिस नावाने कंपनी काढली आहे. गुंतवणूक रकमेला प्रतिमहिना आठ ते दहा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे त्यांनी गाजर दाखविले. अशोक साळुंखे यांनी 32 लाख 35 हजार रुपयांची रक्कम गुंतविली.
मार्च 2021 ते जानेवारी 2022 या अकरा महिन्यांचा परवाना म्हणून संशयितांनी साळुंखे यांना नऊ लाख 20 हजार दिले. तसेच साळुंखे यांना गुंतवणूक रकमेच्या हमीपोटी कंपनीचे पोस्ट डेटेड धनादेश हमीपत्र लिहून देऊन विश्वास संपादन केला. मात्र फेब्रुवारी 2022 पासून संशयितांनी साळुंखे यांना परतावा देण्याचे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली.

Back to top button