सांगली : राष्ट्रकुल विजेता संकेत सरगर, मार्गदर्शक सिंहासने उपेक्षितच | पुढारी

सांगली : राष्ट्रकुल विजेता संकेत सरगर, मार्गदर्शक सिंहासने उपेक्षितच

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रकुलमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेता ठरलेला संकेत सरगर व त्याचे मार्गदर्शक मयूर सिंहासने यांना केंद्र, राज्य सरकार, महापालिका, जिल्हा परिषद, राजकीय नेते यांनी प्रोत्साहन म्हणून वेगवेगळ्या बक्षिसांच्या घोषणांची नुसती लयलूट केली. मात्र गेल्या सहा महिन्यात यातील काहीच झालेले नाही. हे दोघे अद्याप उपेक्षितच आहेत.

सन 2022 च्या जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देऊन इतिहास रचला. या मानाच्या स्पर्धेत तब्बल पन्नास वर्षानंतरचे पदक मिळवण्याचे भाग्य सांगली जिल्ह्याला मिळाले. हे पदक मिळाल्यानंतर सांगलीत सर्वत्र एकच जल्लोष झाला. संकेत आणि प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्यावर अभिनंदनाचा व बक्षिसांचा वर्षाव झाला. राज्य सरकारने संकेतला 30 लाख रुपये, सांगली महापालिकेने दहा लाख रुपये आणि जिल्हा परिषदेने पाच लाख रुपये अशा बक्षिसांची घोषणा केली. मार्गदर्शक सिंहासने यांनाही बक्षीस देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील राजकीय नेते, अधिकारी यांनी संकेतच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. त्याशिवाय सिंहासने यांचेही अभिनंदन केले. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी चांगले खेळाडू घडवण्यासाठी सुसज्ज जीमसाठी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. घोषणा होऊन सहा महिने झाले तरी त्यातले कुठलेच बक्षीस व मदत या दोघांनाही मिळालेली नाही. याबाबत त्यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.

सिंहासने म्हणाले, एक खेळाडू तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ती मेहनत केल्यानंतरच संकेतच्या रूपाने सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. मात्र आपल्याकडे खेळाडू घडण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत फारशी होताना दिसत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकेतला खेळाडू म्हणून तयार करताना मला अनेक अनुभव आले. त्या अनुभवाच्या जोरावर आणखी खेळाडू तयार करण्याची माझी इच्छा आणि धडपड सुरू आहे. मात्र त्याला प्रशासन किंवा सरकारी पातळीवर फारसा प्रतिसाद मिळत नाही. अधिकारी, नेते यांनाही या खेळाचे, खेळाडूंचे, मार्गदर्शकांचे महत्व वाटत नाही. त्यामुळे यापुढे स्पर्धेमध्ये उतरताना सांगलीकडून खेळाडूंना घेऊन कशासाठी उतरायचे असाही प्रश्न कधी-कधी मनात येतो.

नोकरीची फाईल मंत्रालयात पडून

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या खेळाडूला राज्य सरकारमध्ये वर्ग एकच्या नोकरीची नियुक्ती थेट करण्यात येते. त्याप्रमाणे संकेतच्या नोकरीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्याकडून चार महिन्यापूर्वी मंत्रालयात पाठवण्यात आलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीच हालचाल झाली नाही. याबाबत ही सिंहासने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button