तासगाव प्रांत कार्यालयाची लवकरच घोषणा; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही : रोहित पाटील | पुढारी

तासगाव प्रांत कार्यालयाची लवकरच घोषणा; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही : रोहित पाटील

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या दोन तालुक्यासाठी एक उपविभागीय कार्यालय धोरणानुसार तासगाव आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांसाठी स्वतंत्र तासगाव उपविभाग निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. प्रस्तावास मंजूरी देऊन लवकरच निर्मितीची घोषणा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी दिली आहे. बुधवारी मुंबईत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.

रोहित पाटील म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील दोन तालुक्यांचे प्रशासकीय एकत्रिकरण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार दोन तालुक्यांसाठी स्वतंत्र उपविभाग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवण्यात आला होता. २०१० साली महसूल व वन विभागाने तसा पत्रव्यवहार उपविभागीय कार्यालय, मिरज यांच्याशी केला होता. काही कारणास्तव तासगाव उपविभागाचा प्रस्ताव बारगळला.

तासगाव व कवठेमहांकाळ या तालुक्यांचा कारभार हा मिरज उपविभागीय कार्यालयातून चालू आहे. दोन्हीही तालुक्यातील लोकांना शेतजमिनीचे खटले, विद्यार्थ्यांचे दाखले तसेच इतर कामासाठी मिरजला जावे लागते. दरम्यान दोन तालुक्यासांठी एक उपविभाग कार्यालय करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानुसार जिल्ह्यात कडेगाव आणि जत ही दोन उपविभागीय कार्यालये निर्माण करण्यात आली. स्वतंत्र सांगली तालुका मंजूर झाला. तासगाव व कवठेमहांकाळ दोन तालुक्यांसाठी तासगावला उपविभागीय कार्यालय करावे असा प्रस्ताव ३० जून २०१७ ला मिरज उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचेकडे पाठविला.

१ जुलै २०१७ ला तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी तासगाव उपविभाग निर्मितीबाबतचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. पुन्हा एकदा प्रस्ताव बारगळला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच या उपविभागीय कार्यालय निर्मितीला वेग आला. हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडून मंत्रालयात सादर झाला.

सदरच्या प्रस्तावास मंजूरी मिळून तासगाव उपविभाग निर्मितीची घोषणा लवकर करण्यात यावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महसूलच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेऊन त्यास मंजूरी देणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर या दोन तालुक्यातील १२९ गावासाठी तासगाव येथे उपविभागीय कार्यालय सुरु होणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले आहे.

असा आहे प्रस्तावित तासगाव उपविभाग

तालुक्याचे नाव                                      तासगाव                      कवठेमहांकाळ
भौगोलिक क्षेत्र (चौ.कि.मी.)                        ७५९४३                       ७३५६२
लोकसंख्या                                              २५१४९८                     १५२३२७
समाविष्ट गावे                                            ६९                               ६०
समाविष्ठ ग्रामपंचायती                                ६८                                ५९
महसूली मंडळे                                          ६                                  ५
तलाठी संख्या                                          ३५                                २७
मुख्यालयापासून सर्वात दूर गाव                 कचरेवाडी                         ढालेवाडी
मुख्यालयापासून दूर गावाचे अंतर (कि.मी.)   ३२                               ४९

Back to top button