रस्त्यावरून चालताही येईना; शिवशंभोनगर परिसरातील स्थिती | पुढारी

रस्त्यावरून चालताही येईना; शिवशंभोनगर परिसरातील स्थिती

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जुन्या प्रभाग 41 मधील शिवशंभोनगर गल्ली नंबर तीन ‘अ’ मधील रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. यामुळे दुचाकीस्वारांना अपघात होत असून, पादचार्‍यांनाही या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. पथ विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नेमून दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून केली जाते.

या प्रभागात गेल्या एक महिन्यापूर्वी नरेश शिंगटे यांची कनिष्ठ अभियंता म्हणून नेमणूक केली. मात्र, त्यांना प्रभागातील अंतर्गत रस्तेच माहीत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी त्यांच्या सहकार्‍याला या भागात कामे केली का, असा प्रश्न विचारला. त्या वेळी सहकार्‍याने तीन- चार महिन्यांपूर्वी कामे केली असल्याचे उत्तर दिले. याबाबत शिंगटे म्हणाले की, माझ्याकडे 15 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. तुम्ही तक्रार केली का? शिवशंभोनगर भागात कामे केली आहेत, असे उद्धटपणे उत्तर त्यांनी दिले.
पथ विभागाने संबंधित रस्त्यावर काम कधी केले, हे पाहण्यापेक्षा सध्या रस्त्याची दुरवस्था झाली, हे पाहून काम करायला हवे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत

आहे. महापालिकेत गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असून, त्यांना उद्धट उत्तरे देत असल्याचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत, ही बाब गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रभाग 41 पथचे नरेश शिंगटे रजेवर आहेत. त्यांना योग्य ती समज दिली जाईल. शिवशंभोनगर रस्त्याची पाहणी करून तत्काळ खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या जातील.

         डॉ. ज्योती धोत्रे, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी
                                    क्षेत्रीय कार्यालय

Back to top button