वाळवा-शिराळा तालुक्यात बिबट्यांची दहशत!

वाळवा-शिराळा तालुक्यात बिबट्यांची दहशत!

इस्लामपूर, मारुती पाटील : भक्ष्याच्या शोधात चांदोलीचे जंगल सोडून बाहेर पडलेल्या बिबट्यांचा आता उसाचे फडच अधिवास बनला आहे. बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे सातत्याचे होणारे दर्शन, पाळीव प्राणी व नागरिकांवरील वाढते हल्ले यामुळे ऊस पट्ट्यात बिबट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. बिबट्यांची वाढती संख्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा-शिराळा तालुक्यात चिंतेचा विषय बनला आहे. सन 2020 पासून या दोन्ही तालुक्यात पाळीव प्राण्यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या 493 तर माणसांवरील हल्ल्याच्या 6 घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यूही झाला आहे.

एरवी फक्त जंगलातच दिसणारा बिबट्या आता या परिसरात कोल्ह्या-मांजरासारखा लोकांच्या निदर्शनास येऊ लागला आहे. कृष्णा-वारणा नद्यांचे वरदान लाभलेल्या या तालुक्यात वनसंपदेबरोबरच उसाचे मोठे क्षेत्र आहे. चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेल्या या प्राण्यांना येथे शिकारीबरोबरच आधिवासासाठी पोषक जागा व वातावरणही मिळाले आहे. त्यामुळे गेल्या 5-6 वर्षांपासून बिबट्यांची प्रचंड संख्या येथे वाढली आहे. बिबट्याची मादी एका वेळेला 2 ते 6 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे त्यांची पैदास झपाट्याने वाढत आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या प्राण्याने आता उसाची शेतीच आपले निवासस्थान बनवले आहे. उसाबरोबरच या परिसरात डोंगर व झाडीही असल्याने त्यांना लपण्यासाठीही भरपूर वाव आहे.

सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने अनेक भागात बिबट्यांची पिल्ली निदर्शनास येऊ लागली आहेत. ही पिल्ली उसाच्या शेतातच लहानाची मोठी होऊ लागली आहेत. आता जंगलाऐवजी उसाचे शेतच त्यांचा अधिवास झाला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येने तसेच पाळीव प्राणी व नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडवळे, तांबवे, नेर्ले, हुबालवाडी आदी गावात बिबट्याने लोकांवर हल्ल्याचा प्रयत्नही केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ऊसतोड मजुरांच्या एक वर्षाच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतला होता. त्यामुळे या बिबट्यांची परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

अनेक बिबट्यांचा मृत्यू!

गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक बिबट्यांचा मृत्यूही झाला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरच इटकरे, येडेनिपाणी, नेर्ले, केदारवाडी या परिसरात पाच बिबट्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कार्वे, रेठरेधरण, बागणी या गावातून उसाच्या शेतात मृत बिबटे आढळून आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news