सांगली : पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरण सुरू | पुढारी

सांगली : पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरण सुरू

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. सन २०१८ मध्ये सहापदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. सध्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ झाला असून अधिगृहीत जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.

१७ वर्षांपूर्वी या मार्गाचे चौपदरीकरण झाले होते. सन २०१८ साली सातारा ते कागल या १३३ कि.मी. अंतराच्या सहा पदरीकरणास मंजुरी मिळाली होती. कामाच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. शेंद्रे ते पेठनाका व पेठनाका ते कागल अशा दोन विभागांत दोन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३२ कि.मी. मधील पूर्वेकडील अधिगृहीत जमिनीचे सपाटीकरण सुरू झाले आहे. रस्त्यात येणारी अतिक्रमणे, झाडे-झुडपे काढण्यात येत आहेत.

हस्तांतरित जमिनीतील पिके, वहिवाट, टपऱ्या काढल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. काही शेतकरी अतिक्रमणे काढण्यासही तयार नाहीत. १७ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले त्याचवेळी वाढीव जमिनीचे हस्तांतरण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. मात्र १७ वर्षांपासून काही ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अपुरीच राहिली होती. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी वहिवाट सुरू ठेवल्या आहेत. रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने अनेक भागात शेतकऱ्यांना शेतातील ऊस रस्त्यावर आणण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

पुन्हा वृक्षतोड

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी रस्त्याकडेला असणारी १०० ते १५० वर्षाची जुनी वडाची व पिंपळाची झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याकडेला काही प्रमाणात नवी झाडे लावण्यात आली होती. आता सहापदरीकरणावेळी या वाढलेल्या झाडांचीही अनेक ठिकाणी तोड होणार आहे.

Back to top button