सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस | पुढारी

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस

सांगली, पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यात महिनाभर दडी मारलेल्या वरुणराजाने शुक्रवारी पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. सांगली, मिरज, मालगाव शहरांसह जिल्ह्याच्या विविध भागांत दुपारपासून दमदार पाऊस झाला. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले यांना पूर आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे.

आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहर तसेच परिसरात पावसाला सुरुवात झाली. बुधगाव, माधवनगर भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्याच्या पूर्वभागासह ग्रामीण भागाला सायंकाळ नंतर रात्रीपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग तीन ते चार तास पडलेल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढे – नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.

तासगाव शहरासह मंडलातील सर्व गावांत जोरदार पाऊस झाला. मणेराजुरी व मंडलातील सावर्डे, वाघापूर, योगेवाडी, उपळावी, कौलगे, लोढे यासह परिसराला तीन ते चार तास मुसळधार पावसाने झोडपले. सावळजसह मंडलातील, अंजनी, गव्हाण, नागेवाडी, वडगाव, डोंगरसोनी, सिध्देवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, बिरणवाडी या गावात रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.

मांजर्डेसह त्या मंडलातील गावामध्येही मुसळधार पाऊस झाला. विसापूर मंडलातील गावातही मुसळधार पाऊस पडला. येळावी मंडलात दमदार पावसाची नोंद झाली आहे. तासगाव – सावळज रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.

कडेगाव ः शहरासह तालुक्यात मध्यम स्वरूपाा पाऊस झाला. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.कडेपूर ,वांगी, शाळगाव ,शिवाजीनगर येथे पाऊस झाला.

मांगले ः शिराळा तालुक्यातील मांगले, सागाव परिसरात आज पहाटे व दिवसभरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे पावसाअभावी वाळून चाललेल्या कोवळ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर ऊस पिकालाही पाऊस उपयुक्त ठरणारआहे.

म्हैसाळ ः म्हैसाळसह -विजयनगर , नरवाड परिसरात संततधार पाऊस झाला. सायंकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपून काढले. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. या पावसाने त्यांना दिलासा मिळाला आहे.

तासगाव तालुक्यात सर्वाधिक

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी ः मिरज 6 (246.7), जत 3 (199.2), खानापूर-विटा 8.5 (133), वाळवा-इस्लामपूर 1.4 (254.1), तासगाव 19.6 (192.7), शिराळा 8.7 (370.6), आटपाडी 5(118.7), कवठेमहांकाळ 2.8 (156.4), पलूस 7.1 (230.9), कडेगाव 0.9 (176).

Back to top button