सांगली ‘सिव्हिल’चे अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड हृदयविकाराने निधन | पुढारी

सांगली 'सिव्हिल'चे अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड हृदयविकाराने निधन

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर गायकवाड ( वय ४६) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याचे निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला. जयसिंगपूर (ता. शिरोळ) हे त्यांचे मूळ गाव आहे.

डॉ. गायकवाड हे शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ होते. गेल्या १५ वर्षांपासून ते ‘सिव्हिल’मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते वैद्यकीय अधीक्षक या पदावर होते. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. ते दररोज सकाळी साडेआठ वाजता ‘सिव्हिल’मध्ये येत असत. प्रत्येक वार्डातील जाऊन ते रुग्णांची वैद्यकीय तपासणी करीत होते.

मंगळवारीही ते ‘सिव्हिल’मध्ये आले होते. रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर एका रुग्णावर शस्त्रक्रिया | केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी गेले. नाष्टा करीत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यावेळी त्यांना जोराचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. डॉ. गायकवाड हे अत्यंत शांत, संयमी स्वभावाचे व मनमिळावू म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. डॉक्टर, नातेवाईक व त्यांच्या मित्र परिवाराने ‘सिव्हिल’कडे धाव घेतली. ‘सिव्हिल’ चौकात त्यांचे रुग्णालयही आहे. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रणिती, मुलगा, मुलगी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

Back to top button