मिरजेत पोलिस ठाण्याशेजारचा उपनिरीक्षकाचा बंगला फोडला | पुढारी

मिरजेत पोलिस ठाण्याशेजारचा उपनिरीक्षकाचा बंगला फोडला

मिरज : पुढारी वृत्तसेवा; मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारी असणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला चोरट्याने फोडला. परंतू बंगल्यातील कोणत्याही प्रकारचे साहित्य चोरीस गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक अकिब काझी यांचा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारी बंगला आहे. उपनिरीक्षक काझी हे काही दिवसांपूर्वी हज यात्रेसाठी गेले आहेत. तर त्यांचा मुलगा व सून असे दोघे तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मित्राकडे गेले होते. बंद घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने शनिवारी (दि. 24) रोजी मध्यरात्री बंगल्याचा पाठीमागील दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील कपाट फोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने घरातील कपाट फोडून तसेच बंगल्यातील हॉलमध्ये असणारी सर्व कपाटे विस्कटून दागिने अथवा रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही चोरीस गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने बंगल्यातून पलायन केले.

दरम्यान, रविवारी काझी यांच्या शेजारी राहणाऱ्या काहीना बंगल्याच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. याबाबत काझी यांच्या मुलाला माहिती देण्यात आली. काझी यांचा मुलगा घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारीच असणाऱ्या उपनिरीक्षकाचाच बंगला फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button