सांगली : इस्लामपुरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले | पुढारी

सांगली : इस्लामपुरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले

इस्लामपूर; सुनील माने :  इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. खंडणी, खून, चोऱ्या, मारामाऱ्या, मोबाईल चोरी, पाकिटमारांनी यासह आदी गुन्ह्यात वाढ झाली आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इस्लामपूर हे राजकीय व सामाजिक आणि गुन्हेगारीदृष्ट्या संवेदनशील आहे. नेहमीच येथे मोर्चे, विविध आंदोलने होतात. अशा परिस्थितीत येथील पोलिस उपअधीक्षक पद हे गेल्या चार महिन्यापासून रिक्त आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात अपुरी कर्मचारी संख्या आणि खमक्या पोलिसिंग अभावी शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, मारामारी, खुनी हल्ले, खंडणीचे प्रकार सुरू झाले आहेत. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया केल्या होत्या. अनेक गुन्हेगारांना मोक्का लावून गुन्हेगारी विश्वात दरारा निर्माण केला होता. त्यामुळे शहरात शांतता होती. त्यांची बदली झाल्याने गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी इस्लामपूरला पूर्णवेळ खमक्या पोलिस उपअधीक्षक द्यावा, अशी जनतेतून मागणी होऊ लागली आहे.

शहरातील पानटपऱ्यावर मावा गुटखा खाण्यासाठी फाळकुटदादांची मोठी गर्दी असते. पानपट्टी चालकांना हे फाळकूटदादा वेळेवर उधारी देत नाहीत. उधारी मागितली की दमदाटी, असे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी काही सराईत गुन्हेगारांनी पानटपरी चालकाकडे २५ हजाराची खंडणी मागितली. त्यास पाणपट्टीचालकाने विरोध केल्याने त्यांच्या कुटुंबांवरच या गुन्हेगारांनी खुनी हल्ला केला. अकबर मोहल्यातील प्रेमप्रकरणावरून झालेला खुनी हल्ला हा बालगुन्हेगारीचा कळस आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात गुरुवार व रविवार या आठवडा बाजारादिवशी मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. पोलिस रेकॉर्डला मोबाईल गहाळ झाला आहे, अशा नोंदी होते. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. अवैध दारूविक्री, अतिक्रमणे आदी गुन्हेगारी समूळ मोडून काढण्यासाठी पोलिसांनी काटेकोर कारवाई करावी व गुन्हेगारांवर, तसेच समाजकंटकांवर वचक निर्माण करावा. समाजातील शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button