सांगली : कवलापुरात शेतजमीन विक्रीतून  31 लाखाचा गंडा | पुढारी

सांगली : कवलापुरात शेतजमीन विक्रीतून  31 लाखाचा गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कवलापूर (ता. मिरज) येथील शेतजमीन विक्री करण्याचे अमिष दाखवून जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ) येथील दोघांना 31 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायासह 12 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदेव रामचंद्र काळे (वय 43) व त्यांचे मित्र विजय मधुकर चव्हाण (42, दोघे रा. जायगव्हाण) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी काळे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई कृष्णदेव रामचंद्र पाटील (35, वायफळे), अरविंद मच्छिंद्र पाटील (35, बलगवडे), विनायक रामचंद्र सुतार (35, वासुंबे, ता. तासगाव), सुधीर उर्फ भैय्या शिंगाटे (36, पंढरपूर, जि. सोलापूर) व अनोळखी आठ जण (अजून नावे निष्पन्न नाहीत) यांचा समावेश आहे. यातील पोलिस कृष्णदेव पाटील, विनायक सुतार व अरविंद पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

संशयितांनी कवलापूर गावच्या हद्दीतील रसूलवाडी रस्त्यावर 2018 मध्ये 8 एकर 16 गुंठे शेतजमिन असल्याचे जयदेव काळे व विजय चव्हाण यांना सांगितले. काळे व चव्हाण यांनी जमिन पाहून पसंदही केली. दोघांत मिळून ही जमिन घेण्याचे ठरविले. एक कोटी 20 लाख रुपये जमिनीची किंमत ठरली होती. त्यानंतर काळे, चव्हाण यांनी जमिनीच्या मूळ मालकांना बोलावून घेण्यास सांगितले.
संशयितांनी जमिनीच्या करारपत्रावर बनावट फोटो असलेले अमित मनोहर मुळे, अभिजीत मनोहर मुळे, आशालता मनोहर मुळे, जिवंधर भूपाल मुळे, सुकुमार भूपाल मुळे, उत्तम भूपाल मुळे, गुणधर श्रीपाल मुळे, चंद्रकांत श्रीपाल मुळे हे मूळक मालक नसल्याचे माहित असूनही तेच मूळ मालक असल्याची खोटी बतावणी केली. त्यानंतर हेच मूळ मालक असल्याचा दावा करीत या लोकांना काळे व चव्हाण यांच्यासमोर हजरही केले. तसेच या लोकांचे बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तयार करून खरेदीचा दस्त बनविला. त्यावर या लोकांच्या सह्याही घेतल्या. त्यानंतर जमिनीवरील सात-बारा बोजा कमी करण्यासाठी एक लाख रुपये घेतले. अ‍ॅडव्हान्स म्हणून धनादेशद्वारे 6 लाख व रोख 24 लाख असे एकूण 31 लाख रुपये घेतले.

एक महिन्यात व्यवहार पूर्ण करून देतो, असे संशयितांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी व्यवहार पूर्ण केलाच नाही. त्यामुळे काळे व चव्हाण यांनी दिलेले 31 लाख रुपये परत देण्याची मागणी केली. मात्र गेल्या चार वर्षापासून संशयित पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. काहीजणांनी मध्यस्थीही केली. तरीही संशयितांनी दाद दिली नाही. त्यामुळे काळे यांनी अखेर गुरुवारी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयितांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button