सांगली : माधवनगरमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर | पुढारी

सांगली : माधवनगरमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर

माधवनगर; पुढारी वृत्तसेवा :  माधवनगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदी अंजू शेखर तोरो यांनी भाजपच्या जयश्री जयवंत सटाले यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित पॅनेलचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. सुमारे १० वर्षांनंतर सत्तांतर झाल्याने जल्लोष करण्यात आला. सन २००७ ते १२ वगळता शिवाजी डोंगरे यांची गेली २० वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ता होती. या निवडणुकीमध्ये डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, मानजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करून एकास एक या पद्धतीने नियोजन पद्धतीने लढत दिली. परंतु सरपंच वगळता या पॅनेलच्या १३ सदस्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. जयदीप कदम व शुभम उपाध्ये वगळता या पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले.

या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित पॅनेलने १७ जागा लढविल्या. मनीषा संदीप उपासे व अनिता लहू गोसावी हे बिनविरोध आले. उर्वरित १५ जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये या पॅनेलचे १३ उमेदवार निवडून आले. निवडणूक निकालानंतर अंजू तोरो समर्थकांनी गुलाल उधळत विजय उत्सव साजरा केला व गावात फेरी काडून मतदारांचे आभार मानले. फेरीमध्ये नामदेव पाटील, प्रवीण बनकरी आदी सहभागी झाले होते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली असून मतदार कोणत्याही आमिषाला बळी पडले नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया माधवनगर विकास आघाडीचे मानजित पाटील यांनी व्यक्त केली. तर पक्षीय राजकारण न करता सर्व घटकांनाबरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सरपंच अंजु तोरो यांनी दिली.

निवडणूक निकालानंतर शुक्रवार पेठेत किरकोळ वादावादी वगळता गावात शांतता होती. पोलिस निरीक्षक संजय शिरसागर, उपनिरीक्षक महेश डोंगरे व बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Back to top button