सांगली : बुधगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचा तिढा | पुढारी

सांगली : बुधगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचा तिढा

बुधगाव; पुढारी वृत्तसेवा :  बहुरंगी लढत होत असलेल्या बुधगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यात विक्रम पाटील गटाच्या वैशाली पाटील यांनी सरपंचपदासाठी बाजी मारली. मात्र, काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त निवडून आल्याने पुन्हा मागील पंचवार्षिक प्रमाणे गावच्या सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे.

खा. संजय पाटील गट आणि आ. गाडगीळ गट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमनेसामने आले होते. यातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आ. गाडगीळ गटाचे पॅनेलप्रमुख शिवाजी डोंगरे यांनी गावातील भाजपच्या प्रमुख कारभाऱ्यांना एकत्र करून सर्व १७ सदस्य आणि सरपंचपदाची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना अवघ्या दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले. खासदार गटाचे विक्रम पाटील यांनी आपला जनसंपर्क आणि पंचायत समिती सदस्य असताना केलेली कामे या जोरावर एकाकी लढत देत सरपंच पद आणि पाच सदस्य निवडून आणले. त्यांच्या पत्नी सरपंचपदी तर मुलगा सदस्य म्हणून निवडून आला आहे.

दरम्यान, अनेक महत्वाचे मोहरे विरोधात जाऊनही काँग्रेस पक्षाने आठ आणि एक अपक्ष अशी गोळाबेरीज करत उपसरपंचपदावर बाजी मारली आहे. मात्र सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरतो आहे. विकास महाआघाडीच्या माध्यमातून दोन सदस्य विजयी झाले आहेत.

या सर्व रणधुमाळीत गावातील शिवसेना भुईसपाट झाली आहे. शिवसेनेचे नेते बजरंग पाटील यांनी आयात उमेदवारांवर भिस्त ठेवल्याने मतदारांनी त्यांना साफ नाकारले. यामुळे बहुमत एकीकडे आणि लोकनियुक्त सरपंच एकीकडे असे त्रांगडे पुन्हा निर्माण झाले आहे. नवख्या उमेदवारांनी दिग्गजांचा पराभव केला असून सर्वच सहा वाडीत प्रस्थापितांना मतदारांनी नाकारल्याचे समोर आले. सरपंचपद मिळाले; पण सत्ता गेली, अशी अवस्था भाजपची तर; सत्ता आली पण सरपंचपद गेले अशी गत काँग्रेसची झाली. यातून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Back to top button