सांगली: बालेकिल्ले शाबूत; जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा | पुढारी

सांगली: बालेकिल्ले शाबूत; जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  मोठ्या चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांनी आपले बालेकिल्ले अबाधित ठेवले. मतमोजणी झालेल्या 416 गावांपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 115 गावांवर वर्चस्व मिळवले. भाजपने 90 ठिकाणी विजय मिळविला. काँग्रेसला 50, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 22 ठिकाणी विजय मिळाला. उद्धव ठाकरे गटास 8, तर संमिश्र पक्षांच्या स्थानिक आघाड्यांची 90 ठिकाणी सत्ता आली. दरम्यान, निवडणुकीनंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाकांची आतषबाजी आणि गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

शिराळा : राष्ट्रवादीचा सर्वाधिक 33 गावांत विजय

शिराळा तालुक्यामध्ये विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे एकत्र आल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीने सर्वाधिक 33 गावांत विजय मिळवला. या ठिकाणी भाजपला 16 ठिकाणी यश आले, तर स्थानिक आघाड्यांची 6 ठिकाणी सत्ता आली. तालुक्यातील नेत्यांनी आपले गड अबाधित राखले.

आटपाडी : भाजपला 14 जागा

आटपाडी तालुक्यामध्ये शिंदे गटात गेलेले आमदार अनिल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील विरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. त्यामध्ये भाजपला 14 जागा तर आमदार बाबर गटाला आठ जागा मिळाल्या. पवारांच्या घरणेशाहीवर टीका करणारे आ. पडळकर यांच्या आई सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

कडेगाव : कदम गटाचा दबदबा कायम

कडेगाव तालुक्यामध्ये माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाचा दबदबा कायम राहिला. या ठिकाणी 39 ग्रामपंचायती पैकी काँग्रेसला 33 तर भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाचा या ठिकाणी धुवा उडाला. मागील निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला होता. मात्र यावेळी तो भरून काढला.

खानापूर : आ. बाबर यांचा करिष्मा कायम

खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर यांचा करिष्मा कायम आहे. या ठिकाणी बाबर यांच्या गटाला 31 तर माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाला 12 ठिकाणी सत्ता आली. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन जाधव यांचा पराभव झाला. तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुलभा आदाटे व पंचायती समिती सदस्य संजय मोहिते हे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले.

पलूस : 14 पैकी 9 ग्रामपंचायती काँग्रेसकडे

पलूस तालुक्यात माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे वर्चस्व कायम राहिले. तालुक्यात 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला नऊ तर भाजपला तीन गावात विजय मिळाला. राष्ट्रवादीला एक तर विकास आघाडीला दोन ठिकाणी यश मिळाले.

तासगाव : आमदार गटाची 14 तर खासदार गटाची 9 ठिकाणी सत्ता

तासगाव तालुक्यामध्ये आ.सुमनताई पाटील व खा. संजय पाटील या ठिकाणी जोरदार लढत झाली. त्यात 14 गावांमध्ये आमदार गटाने यश मिळवले तर खासदार गटाला नऊ ठिकाणी सत्ता मिळाली. तीन ठिकाणी आघाडीची सत्ता आली आहे.

कवठेमहांकाळ : राष्ट्रवादीचा 15 गावात विजय

कवठेमहांकाळ तालुक्यात आ. सुमनताई पाटील यांच्या राष्ट्रवादीने पंधरा गावात विजय मिळाला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाला सात ठिकाणी विजय मिळाला तर भाजपला तीन गावात विजय मिळाला. राष्ट्रवादी व भाजप अशी एकत्रित आघाडीची दोन ठिकाणी सत्ता आली. विकास आघाडीला एक ठिकाणी सत्ता मिळाली.

मिरज : 25 पैकी 16 गावात भाजप

मिरज तालुक्यात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या भाजप पक्षाचा दबदबा राहिला. तालुक्यातील 25 गावांपैकी 16 गावात भाजप गटाची सत्ता आली. राष्ट्रवादीला पाच तर संमिश्र आघाडीला 4 गावात सत्ता आली. बेडग येथेे भाजपांतर्गत दोन गटात लढत झाली.

वाळवा : बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी

वाळवा तालुक्यात माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दबदबा राहिला आहे. या तालुक्यात 88 गावात निवडणूक लागली होती. त्यापैकी सात ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यात 4 ठिकाणी राष्ट्रवादी तर 3 ठिकाणी इतर गटाला सत्ता मिळाली होती. बाकी आज झालेल्या निवडणुकीत चार-पाच ठिकाणचा अपवाद वगळता राष्ट्रवादीची सत्ता आली. अनेक गावात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत झाली. रात्री उशिरापर्यंत सर्व गावांचे निकाल हाती आले नव्हते; मात्र बहुतांश गावांवर राष्ट्रवादीने कब्जा केल्याचे चित्र होते.

जत : भाजपला 37 जागा

जत तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी 81 गावात निवडणूक होती. त्यापैकी माजी आ. विलासराव जगताप नेतृत्व करीत असलेल्या भाजपला 37 गावात सत्ता मिळाली. विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेसला 21 गावात विजय मिळाला. तर सुरेश शिंदे प्रकाश जमदाडे हे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीला सात ठिकाणी सत्ता मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाला एक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला चार ठिकाणी सत्ता आली. तालुक्यात संमिश्र आघाडीला नऊ ठिकाणी सत्ता आली.

आमदार सावंत यांना गावातच फटका

जत तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. विद्यमान आ. विक्रम सावंत यांच्या गावातच सत्तांतर झाले. भाजपची सर्वाधिक गावात सत्ता आली आहे.

दुधगाव, ब्रह्मनाळला स्वाभिमानी सत्ता

वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्राबल्य आहे. मात्र तालुक्यातील दुधगाव येथे मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या गटाचा पराभव झाला. त्याशिवाय ब्रम्हनाळ येथेही स्वाभिमानीची सत्ता आली.

वाळवा तालुक्यात धक्कादायक निकाल

वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मात्र या तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. ताकारीमध्ये विनायकराव पाटील यांच्या पत्नी पराभूत झाल्या. त्या ठिकाणीही सत्तांतर होत विरोधकांची सत्ता आली. कुरळपमध्ये राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांच्या गेल्या 30 वर्षांच्या सत्तेला धक्का बसला. वाळवा येथे जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील सरपंच म्हणून निवडून आले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील हे कामेरी येथून सरपंच म्हणून निवडून आले. पंचायत समितीच्या सभापती शैलजा पाटील सरपंच म्हणून निवडून आल्या. महाडिक गटाचा बालेकिल्ला ओळखल्या जाणार्‍या पेठ येथे त्यांच्या गटाची सत्ता जाऊन राष्ट्रवादीची सत्ता आली. नेर्लेे येथे राष्ट्रवादी व महाडिक गट यांच्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या लढतीत राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांनी बाजी मारली.

Back to top button